भंडारा रुग्णालयातील अग्निकांडाची घटना ताजी असतानाच चिमुकल्यांच्या आरोग्याबाबत हलगर्जी बाळगणारी आणखी एक घटना राज्यात समोर आली आहे. पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्यामुळे यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांची प्रकृती बिघडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळे पाच वर्षांखालील चिमुरड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  (Yawatmal 12 children admitted to hospital after sanitizer given instead of Polio Dose)

यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला. लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजले. 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वय वर्ष ते पाच वयोगटातील ही लहान मुलं आहेत.

सुरुवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरु झाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ घटनेची चौकशी करत आहेत.

पोलिओ ऐवजी सॅनिटायजर देण्याचा हा प्रकार गंभीर असून आणि या प्रकारांमध्ये कोणाच्या कडून चूक झाली याची चौकशी सुरू आहे. ज्यावेळी मुलांना लस देण्यात आली त्यावेळी लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजर होते. त्यामध्ये कुणाकडूनही चूक झाली, याचा सर्व तपास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी करीत आहेत. याप्रकरणी निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

दरम्यान रुग्णालयात दाखल मुलाची प्रकृती स्थिर आहे. पालकांनी झालेल्या घटनेला आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे सांगित. गावातील सरपंचाच्यासतर्कतेने हा प्रकार पुढे आला.