‘इश्‍कवाला महिना’ नावाने फेमस असलेल्या फेब्रुवारीला सुरुवात होताच सायबर गुन्हेगारांनी नवीन जाळे फेकणे सुरू केले आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ बाहेर महागड्या हॉटेलमध्ये साजरा करण्याच्या बेतात असलेल्या प्रेमीयुगुलांना टार्गेट करण्यात आले आहे.(Valentine's Day) ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त ‘फ्री गिफ्ट’ कुपन किंवा ‘गिफ्ट कार्ड’ देण्याचे आमिष दाखवत लिंक असलेला मॅसेज व्हायरल करण्यात आला आहे. त्या लिंकवर क्लिक करताच ग्राहकाचे बॅंक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सायबर क्रिमिनल्स सक्रिय झाले आहे. त्यासाठी नवनवीन फंडे वापरण्यात येत आहेत. युवा पिढीमध्ये सर्वाधिक चर्चित असलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला ऑनलाईन खरेदी वाढते. 

गिफ्ट आर्टीकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्रीसुद्धा वाढते. महिला किंवा तरुणींसाठी असलेल्या फॅशनेबल वस्तूंची ऑनलाईन विक्री वाढते. तसेच शहरातील महागड्या हॉटेलमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine's Day) साजरा करण्यांचा अनेकांचा प्लान असतो.हीच संधी हेरून सायबर क्रिमिनल्स सज्ज झाले आहेत. युवा वर्गाला हेरण्यासाठी सध्या सोशल मीडियावर एक मॅसेज वेगाने पसरत आहेत. या मॅसेजमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त गिफ्ट कुपन किंवा गिफ्ट कार्ड मिळणार असून शहरातील महागड्या हॉटेलमध्ये राहणे, खाणे-पिण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. या आमिषाला प्रेमीयुगुल बळी पडू शकते. त्या मॅसेजमधील लिंकवर क्लिक करताच बॅंक खात्यातील रक्कम परस्पर लंपास केली जाण्याची शक्यता आहे.


 त्यामुळे प्रेमीयुगुलांनी अशा मॅसेजपासून सावधान राहण्याची गरज आहे. ऑनलाईन गिफ्ट घेताय?स्मार्टफोन आल्यामुळे ऑनलाईन खरेदी, मार्केटिंगवर युवा पिढीचा जोर आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त वेगवेगळ्या शॉपिंग वेबसाईटवर ऑफर्स आणि सेल सुरू आहे. मात्र, आपल्या प्रीय व्यक्तीसाठी ऑनलाईन गिफ्ट खरेदी करताना सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे. मुंबईतील ताज हॉटेलच्या नावानसुद्धा असाच बनावट मॅसेज फिरत आहे. मोठमोठ्या ब्रॅंडची बनावट नावाने वेबसाईट तयार करून गंडविण्याचा प्रयत्न सायबर क्रिमिनल्स करण्याची शक्यता आहे.