छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असणारा किल्ले प्रतापगड आणि किल्ले(fort) अजिंक्‍यताराच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्‍यक असून, हे दोन्ही किल्ले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी आज खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन केली.

 भेटीदरम्यान आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूजक असून, आई भवानीचा उपासक असल्याचे सांगत नायडू यांनी उदयनराजेंविषयी आदर व्यक्‍त केला. भेटीदरम्यान खासदार उदयनराजे यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराजाचा वारसा सांगून महाराजांच्या पराक्रमाचा अमूल्य असा ऐतिहासिक ठेवा संपूर्ण देशाला पाहायला मिळत असल्याचे नायडू यांच्या निदर्शनास आणून दिले. महाराजांनी स्थापलेल्या मराठा साम्राज्याच्या पाउलखुणा आजही कायम असून, तो वारसा जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मराठा साम्राजाची राजधानी असणारा अजिंक्‍यतारा आणि देशाच्या राजकीय, सामाजिक इतिहासाला कलाटणी देणारी प्रतापगड(fort) पायथ्याला झालेली गनिमी काव्याच्या लढाईला फार महत्त्व आहे. महाराजांच्या गनिमी काव्याचा इतिहास असणारा प्रतापगड, तसेच राजधानीची शान असणाऱ्या अजिंक्‍यताऱ्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी या वेळी नायडू यांच्याकडे केली. उदयनराजेंचे मत ऐकून घेतल्यानंतर नायडू यांनी त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना करण्याचे आदेश दिले. भेटीदरम्यान खासदार उदयनराजेंनी नायडू यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा भेट दिली.