Police's 'Highway Mrityunjay Yojana'!राज्यातील विविध महामार्गांवर वाहनचालक शिस्त पाळत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात (Accident) होतात. अनेकांचा जीव जातो. मात्र आता महामार्गांवर होणाऱ्या अपघातातील जखमींचा (injuries) जीव वाचवण्यासाठी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण राज्यात हायवे मृत्यूंजय योजना राबवली जाणार आहे. तशी घोषणा राज्य वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.

कशी आहे हायवे मृत्यूंजय योजना ?
 1)महामार्गांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना तात्काळ मदत मिळावी यासाठी महामार्ग परिसरातील ठराविक स्थानिकांना मृत्यूंजय देवदूत हे नाव देण्यात येणार आहे. 

2)ज्या स्थानिकांना मृत्युंजय देवदूत हे नाव दिले जाईल ते सरकारी व्यवस्थेशी जोडले जातील आणि अपघातग्रस्तांना मदत मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका असेल.
 
3)मृत्युंजय देवदूतांना अपघातग्रस्तांच्या तात्काळ मदतीसाठी लागणारे स्ट्रेचर, फर्स्ट एड बॉक्स आणि इतर साहित्यही दिले जाणार. 

4)आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती मृत्युंजय देवदूत अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणार.

 5)महामार्ग सुरक्षा पथकाकडून मृत्युंजय देवदूतांना ओळळपत्रही देण्यात येणार. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्यांचा देवदूतांचा राज्य सरकारच्या रस्ते सुरक्षा विभागाकडून सन्मानही केला जाणार 

 रस्ते अपघातात हजारो मृत्यूमुखी (Death) 2020चा विचार केला तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी रस्ते अपघातात तब्बल 11 हजार 452 जणांचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती रस्ते वाहतूकमंत्री अनिल परब यांनी 18 जानेवारी 2021 रोजी दिली आहे. 2020 मध्ये महाराष्ट्रात एकूण 25 हजार 456 अपघातांची (Accident)  नोंद झाली. त्यात 11 हजार 452 जणांनी आपले प्राण गमावले. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी व्यक्त केलं होतं. जानेवारीमध्ये रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी वाहन चालकांना ‘यमाला रोखण्यासाठी संयम बाळगा आणि नियम पाळा’ असं आवाहन केलं होतं. 

दरम्यान, 2020 मध्ये कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघातांची संख्या कमी झाली होती. 2019 ची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात एकूण 32 हजार 295 अपघातांची नोंद झाली होती. त्यात 12 हजार 788 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी रस्ते वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात सामान्य नागरिकांना सहभागी करुन घेण्यात येणार असल्यामुळे या उपक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलं असेल.