crime news- कोल्हापूर (उजळाईवाडी ) येथील कोर्ट कॉलनीतील बंगला फोडून चोरट्यांनी आज भरदिवसा २५ तोळे दागिन्यांची चोरी केली. याच कॉलनीतील आणखी एक बंद बंगला फोडला आहे. त्यातील किती ऐवज चोरीस गेला, याची नोंद अद्याप झालेली नाही. सलग दोन चोऱ्यांमुळे कॉलनी हादरली आहे. घरफोडीचे प्रकार (robbery) सायंकाळी चार ते सात या दरम्यान झाले आहेत.
याबाबत गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात नोंद आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः कॉलनीतील स्नेहल सदाशिव बेडक्याळे यांचा बंगला बंद होता. स्नेहल बेडक्याळे आपल्या दहावीत शिकणाऱ्या मुलास चारच्या दरम्यान घरातून राजारामपुरी येथे क्लासला सोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे पती सदाशिव बेडक्याळे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून मिरजेला कार्यरत आहेत.
1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…
2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती
3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक
--------------------------------
बंगल्यात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. बेडरूममधील कपाटे फोडली. त्यापैकी एका कपाटात चोरट्यांच्या हाती २५ तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी हाती लागली. चोरट्यांनी मंगळसूत्र, हार, बांगड्या, चेन, अंगठी, कर्णफुले, मोत्याचे पेंडंट, लॉकेट व चांदीची भांडी असा सारा ऐवज उशीच्या कव्हरमध्ये घालून पोबारा केला. दरम्यान, या बंगल्यापासून पाचशे मीटरवरील अन्य एका बंगल्यातही चोरी (robbery) झाली आहे. हा बंगला सुर्वे यांचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तो बंगलाही बंद असल्याने चोरीचा तपशील पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
दरम्यान, घटनास्थळी ठसेतज्ज्ञांना बोलाविण्यात आले. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी भेट देत पंचनामा केला आहे. करवीर उपविभागीय पोलिस अधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या आहेत.