raj thackeraypolitics news- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कल्याण-डोंबिवलीत खिंडार पडलं आहे. मनसेच्या राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत तर आज मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला सावरण्याचं आव्हान आता मनसेच्या नेत्यांसमोर आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

"निवडणुकीच्या काळात पक्षांतराच्या घटना होतच असतात. यात नवीन काहीच नाही. काही जणांनी पक्ष सोडला म्हणून पक्षाला फरक पडत नाही. जुने गेले तर नवे कार्यकर्ते अशा ठिकाणी उभारी घेत असतात. सगळ्यांना राज ठाकरे होता येत नाही", असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे (raj thackeray) यांच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज'वर आज मनसेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला बाळा नांदगावकर यांच्यासोबच कल्याण-डोंबिवलीचे आमदार राजू पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.   

------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------

"राजकारणात पक्षांतराच्या गोष्टी घडतच असतात. प्रत्येक निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षात असं होत असतं. यात नवीन काहीच नाही. मध्यंतरी मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कितीतरी लोक सोडून दुसऱ्या पक्षात गेले, काँग्रेसचे लोकही सोडून गेले. पुढे जे काही होईल ते बघा, त्यावर मी आताच भाष्य करण्यात पॉइंट नाही", असं बाळा नांदगावकर म्हणाले. 

मनसेचे कल्याण-डोंबिवलीचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मंदार हळबे यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हळबे यांच्या पक्षांतराबाबत बोलताना कल्याण-डोंबिवलीचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी हळबे यांच्यावर आरोप केला.  (politics news)

"पक्ष सोडणाऱ्यांची पक्षावर नाराजी नव्हती असं ते म्हणतं आहेत. तरीही ते दुसऱ्या पक्षात गेले. मग यामागे समोरच्या पक्षाकडून आमीष दिलं गेलं नाही, तर मग इतर दुसरं कारण काय असू शकतं?", असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला. 

"एक-दोन कार्यकर्ते सोडून गेल्यानं पक्ष म्हणून काही फरक पडत नाही. निवडणूक आली की असे धक्के बसणारच. याला काही जास्त महत्व देण्याची गरज नाही. आम्ही निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत आहोत. आमीष दाखवल्यानंच पक्षांतरं होतं आहेत", असंही ते पुढे म्हणाले.