Bombay Begums Trailer


ऑनलाइन टिम :

नेटफ्लिक्सवरील (netflix)  बहुचर्चित 'बॉम्बे बेगम' सीरिज  (web series) लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यात पूजा भट्ट मुख्य भूमिकेत दिसत आहे. विशेष म्हणजे पूजा या सीरिजमधून पुनरागमन करत आहे. ही सीरिज वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळं आयुष्य जगणाऱ्या पाच महिलांच्या आयुष्यवर आधारित आहे, ज्यांना त्यांच्या आयुष्याकडून निरनिराळ्या अपेक्षा आहेत.

या सीरिजमध्ये पूजासोबत अमृता सुभाष, शहाणा गोस्वामी, प्लाबिता बोर्थाकुर आणि आध्या आनंद या अभिनेत्री मुख्य भूमिकांमध्ये असणार आहेत. पूजा एका व्यावसायिक महिलेची भूमिका करत असून अमृता एका बारमध्ये डान्स करणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारत आहे. अमृताला इतर महिलांप्रमाणे तिचं आयुष्य सन्मानाने जगायचं आहे. तर शहाणाचं स्वप्न कंपनीच्या सर्वोच्च पदावर पोहोचणं आहे. यासाठी ती अथक मेहनतही घेत असते. पण अनपेक्षित गरोदरपणामुळे तिचं हे स्वप्न धूसर होताना दिसतं. या पाचजणींचं आयुष्य एका अपघातानंतर एकमेकींशी कसं जोडलं जातं हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.--------------------------

या सीरिजमध्ये (web series) पूजा आणि अमृता यांसारख्या तगड्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ही सीरिज पाच अशा स्रियांच्या आयुष्यावर आधारित आहे ज्यांची स्वप्नं वेगळी आहेत, त्यांचं जग वेगळं आहे, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीही फार वेगळ्या आहेत पण तरीही त्या एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत. या पाचही जणींच्या आयुष्याच्या प्रवासाची अभूतपूर्व कहाणी प्रेक्षकांना या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

ही सीरिज महिलांच्या आयुष्यातील अडचणींचा पाढा वाचणारी असून तितकीच प्रेरणादायक आहे. या सीरिजचं लेखन आणि दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव यांनी केले आहे. अलंकृताने यापूर्वी 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' आणि 'डॉली, किट्टी अँड वो चमकते सितारे' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटाचं लेखन केलं आहे.