Natural Skin CareNatural Skin Care - वातावरणातील बदलामुळे आपल्या त्वचेवरही दुष्परिणाम होतात. सध्याच्या हवामानामुळे त्वचेवर मृत पेशी जमा होणे, उन्हामुळे त्वचा टॅन होणे यासारख्या समस्या उद्भवणे ही सामान्य बाब आहे. पण यामुळे काही जणांची त्वचा अतिशय निस्तेज दिसू लागते. महागड्या क्रीम, औषधोपचार करूनही चेहऱ्यावर तुमच्या मनाप्रमाणे चमक दिसत नाहीय का?

चिंता करू नका. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी एक सोपा आणि स्वस्त नैसर्गिक उपाय आपण जाणून घेऊया. यासाठी आपल्याला अधिकचा खर्च देखील करावा लागणार नाही. 

​हा आहे सीक्रेट फॉर्म्युला

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असल्यास आपण लिंबू आणि साखरेची मदत घेऊ शकता. हा उपाय करण्यासाठी एक लिंबू आणि तीन ते चार चमचे साखर ही सामग्री आवश्यक आहे.

लिंबाचा रस आणि साखर वाटीमध्ये एकत्र घ्या व स्क्रब तयार करा. या मिश्रणामुळे त्वचेवरील मृत पेशींची समस्या दूर होण्यास मदत मिळेल आणि त्वचेवर नैसर्गिक चमक देखील येईल.

पण चेहरा तसंच अन्य अवयवांच्या त्वचेवर लिंबू किंवा लिंबाचा रस थेट लावण्याची चूक करू नये. यामध्ये पाणी किंवा गुलाब पाणी मिक्स करावे. तसंच खबरदारी म्हणून लिंबाचा त्वचेवर उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.

--------------------------

​असा करावा उपयोग (Natural Skin Care)

सर्वप्रथम आपला चेहरा, हात-पाय स्वच्छ धुऊन घ्या. आता एका वाटीमध्ये चार चमचे साखर आणि दुसऱ्या वाटीमध्ये लिंबाचा रस काढून घ्या.

लिंबाची साल फेकू नये. त्यावर तयार केलेलं मिश्रण लावून स्क्रबिंग करावे. लिंबाचा रस व साखरेच्या मिश्रणात साल बुडवा. यानंतर चेहरा, मान, हात, पायाच्या त्वचेवर गोलाकार दिशेमध्ये स्क्रबिंग करा.

​त्वचेवर येईल नैसर्गिक चमक

लिंबू आणि साखरेच्या मिश्रणामुळे संपूर्ण शरीराची त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळेल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला केवळ १५ मिनिटांचा कालावधी आवश्यक आहे. या नैसर्गिक स्क्रबमुळे त्वचेवरील मृत पेशी काढण्यास मदत मिळते आणि त्वचेची खोलवर स्वच्छता होऊन त्वचा चमकदार होते.

त्वचेमध्ये सकारात्मक बदल अनुभवण्यासाठी आठवड्यातून एकदा हा उपाय करावा.

चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्यानंतर जळजळ होत असल्यास मिश्रणामध्ये दोन चमचे गुलाब पाणी मिक्स करावे. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल. पण त्वचा अधिक लाल होत असल्यास किंवा खाज सुटत असल्यास हा उपाय करू नये.

​स्क्रबिंगनंतर हे काम करणं आवश्यक

संपूर्ण शरीराचे स्क्रबिंग केल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी. यानंतर त्वचेवर मॉइश्चराइझर लावायला विसरू नये. आंघोळ केल्यानंतर त्वचा अतिशय मऊ असते तसंच त्वचेवरील रोमछिद्रे देखील मोकळी होतात. अशा वेळेस मॉइश्चराइझर लावल्यास त्वचेला भरपूर लाभ मिळतात.

मॉइश्चराइझरमुळे त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. आंघोळ केल्यानंतर १० ते १५ मिनिटांनंतर मॉइश्चराइझर लावल्यास त्वचेला अधिक लाभ मिळणार नाहीत, कारण तोपर्यंत शरीराची त्वचा कोरडी होते.