arun laadpolitics news- राज्यातील पदवीधर मतदारांनी मला आमदारकीची संधी देत पुणे मतदासंघातून भाजपला हद्दपार केले. पदवीधरांसाठी आगामी काळात राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून तशी मागणी केली असल्याची माहिती आमदार अरुण लाड यांनी आज सोलापुरातील पत्रकार परिषदेत दिली. आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन पदवीधरांच्या प्रश्‍नांवर चर्चा केली आहे. महामंडळाच्या माध्यमातून पदवीधरांचे सर्वच प्रश्‍न सोडविले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (real clear politics)

पुणे जिल्ह्यातील पदवीधरांची नोंदणी यापूर्वी 57 हजारांपर्यंतच होती.मात्र, निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी अचानकपणे ती संख्या एक लाख 34 हजारांवर नेऊन ठेवली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर संख्या वाढत नसतानाही त्यांनी हा चमत्कार कसा केला, याचा शोध सुरु आहे. मात्र, त्याचाही त्यांना काहीच लाभ झाला नाही आणि माझा 50 हजार मतांनी विजय झाल्याचेही लाड यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, श्री. लाड म्हणाले, एक कोटींपर्यंत शेतकरी हमीभावासाठी आंदोलन करतानाही मोदी सरकारने त्यावर मार्ग काढलेला नाही. चीनचा माल अजूनही देशात बिनधास्तपणे येतो आहे. 

------------------------------------

Must Read


1) अन्यथा तुमचे तुणतुणे बंद करू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा


2) सनी लिओनीवर दाखल झाला गुन्हा.....!!!


3) सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले


------------------------------------

शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा घाट मोदी सरकारने घातला असून आगामी काळात शिक्षण महागणार आहे. कामगार अस्वस्थ असून मोदी सरकारने घटनेची मोडतोड केली. कार्पोरेट कंपन्यांच्या फायद्याचेच कायदे मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी याप्रसंगी केला. राज्यात ओबीसी- मराठा हा वाद कधीच नसतानाही आता भाजपवाल्यांना काही काम नसल्याने ते अशाप्रकारे भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे पदवीधर मतदारसंघात पाच जिल्हे आणि 58 तालुक्‍यांचा समावेश आहे. या मतदारसंघातील बहुतांश मतदारांनी मला पहिल्या पसंतीचे मत दिले तर विरोधकांना मतदानच केले नाही. पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी होणारा मी पहिलाच आमदार आहे. दरम्यान, ज्यांनी या मतदारसंघाचे 12 वर्षे प्रतिनिधीत्त्व केले, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात एकदाही पदवीधर हा शब्द उच्चारला नाही. (real clear politics)

देशात, राज्यात सत्ता असतानाही त्यांनी सुशिक्षित तरुणांसाठी काहीच केले नसल्यानेच मला या निवडणुकीत यश मिळाल्याचेही लाड यांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडीने एकत्रित येऊन काम केल्याचा मोठा फायदा झाला आणि आगामी काळातही महाविकास आघाडी कायम राहिल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. माझ्या मोबाईलवर सुमारे 15 हजार पदवीधरांनी त्यांचे प्रश्‍न मांडले असून त्याचा अभ्यास करुन त्यावर मार्ग काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेसाठी आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, कार्याध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष जुबेर बागवान आदी उपस्थित होते.