CSK team players


ऑनलाइन टिम :

गेल्या वर्षीचं अपयश विसरुन नव्या जोमानं चेन्नई सुपर किंग्स (CSK) यावर्षीच्या आयपीएलमध्ये उतरणार आहे. चेन्नईला या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची पहिली पायरी गुरुवारी पार करावी लागेल. गुरुवारी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात (Live IPL auction Updates) धोनीच्या टीमला योग्य खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. चेन्नईनं या लिलावापूर्वी अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) ला रिलीज केले आहे. त्यामुळे हरभजनच्या जागी चेन्नईनं इंग्लंडच्या मोईन अलीला (Moeen Ali) खरेदी करावं असा सल्ला माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhi) यानं दिला आहे.

‘चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni)  ऑफ स्पिनरला नेहमी प्राधान्य देतो. त्यामुळे त्यानं मोईन अलीला खरेदी केलं तर त्याच्या अनेक अडचणी कमी होतील,’ असं मत गंभीरनं व्यक्त केलं आहे. इंग्लंडचा हा स्पिनर हरभजनची जागा भरुन काढेल, असा विश्वास गंभीरनं व्यक्त केला आहे.

----------------------------

काय म्हणाला गंभीर?

‘सीएसकेकडं सध्या इम्रान ताहीर आणि कर्ण शर्मा हे दोन लेगस्पिनर आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडं डाव्या हातानं बॉलिंग आणि चांगली बॅटींग करु शकेल असा स्पिनर (मिचेल स्टॅनर) देखील आहे. आता टीमला एका ऑफ स्पिनरची आवश्यकता आहे. जो प्रतिस्पर्धी टीमच्या उजव्या हाताच्या फलंदाजांच्या विरुद्ध उपयुक्त ठरेल. धोनीच्या टीममध्ये नेहमीच

ऑफ स्पिनरला खास स्थान राहिले आहे. यापूर्वी आर. अश्विन आणि हरभजन सिंग होते. आता त्यांना नव्या बॉलनं बॉलिंग करु शकणाऱ्या स्पिनरची गरज आहे. मोईन अलीमध्ये ही क्षमता आहे, ’’ असं गंभीरनं (Live IPL auction Updates)  सांगितले.

'मोईन अलीमुळे फायदा'

‘मोईन अली नव्या बॉलनं बॉलिंग करण्याबरोबरच लोअर ऑर्डरमध्ये बॅटींग करु शकतो. त्यानं टी-20 क्रिकेटमध्ये हे काम पूर्वी केलं आहे. तसंच तो चेन्नईसाठी ओपनिंगही करु शकतो. प्रतिस्पर्धी टीमकडे उजव्या हातानं बॅटिंग करणारा ओपनर असेल तर मोईन अली पहिली ओव्हरही टाकू शकतो. चेन्नईच्या पिचवर तो प्रभावी ठरेल,’ असे गंभीरनं स्पष्ट केले.

चेन्नई टेस्टमध्ये चमकला मोईन!

गौतम गंभीरनं जे काही सांगितलं आहे, ते सर्व मोईन अलीनं नुकत्याच झालेल्या चेन्नई टेस्टमध्ये दाखवले आहे. या टेस्टमध्ये मोईन अलीनं 8 विकेट्स घेतल्या. त्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 18 बॉलमध्ये 43 रनची आक्रमक खेळी देखील खेळली होती. यामध्ये पाच सिक्सचा समावेश होता.