कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये वाढत चालले असताना इचलकरंजीत शनिवारी विविध तीन भागात तीन रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या वस्त्रनगरीत कोरोनाने पुन्हा शिरकाव केल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी शहर हॉटस्पॉट बनले होते. मात्र प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी घेतलेल्या खबरदारीमुळे इचलकरंजी कोरोनामुक्त झाली.
मात्र गुरूवार दि. 11 रोजी यशवंत कॉलनी परिसरातील 52 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आठवडा उलटल्यानंतर आवळे गल्लीतील 58 वर्षीय, घोरपडे नाट्यगृह परिसरातील 57 वर्षीय इसमाला तर बीजेपी मार्केटमधील 46 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आज प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे आजअखेर रूग्णांची संख्या 4033 वर पोहचली आहे तर कोरोनामुळे 194 जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी शहरात तीन रूग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करून शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.