Chhatrapati Shivaji Maharaj International Libraryऑनलाइन टिम :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत कोणतेही पुस्तक (Book) एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे व यावर संशोधनात्मक अभ्यास करता यावा या हेतूने जगातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय (International Library) व संशोधन केंद्र येत्या दीड वर्षात रत्नागिरीत सुरू होणार आहे. याशिवाय संस्कृत विश्वविद्यालय उपकेंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ उपकेंद्र आणि स्पर्धा परीक्षा केंद्र रत्नागिरीत सुरू करण्याच्या महत्वपूर्ण शैक्षणिक निर्णयाच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

विविध शैक्षणिक उपक्रमांव्दारे कोकण शैक्षणिक हब व्हावे यासाठी धोरणात्मक निर्णय सामंत यांनी घेतले आहेत. येत्या दीड वर्षात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय (International Library) व संशोधन केंद्र रत्नागिरी शहरात होणार आहे. याच ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्रही सुरू करण्यात येणार आहे यासाठी आयटीआय परिसरातील 2 एकर जागा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत (press conference) मंत्री सामंत यांनी शैक्षणिक क्षेत्रातील 4 महत्वपूर्ण निर्णयाची घोषणाही केली.

--------------------------

तत्पूर्वी याठिकाणी विविध शैक्षणिक विद्यापीठ प्रमुखांबरोबर बैठकही झाली. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची 4 उपकेंद्रे सुरू करण्याचाही निर्णय झाला आहे. येत्या जूनमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे. रत्नागिरी, पुणे, औरंगाबाद आणि नांदेड या 4 ठिकाणी ही उपकेंद्रे होणार आहेत. देशातील प्राचीन भाषांचा अभ्यास व संशोधन व्हावे या हेतूने ही चार उपकेंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्कृत उपकेंदाच्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. शहरातील जुन्या बीएड कॉलेजच्या जागेवर उभ्या असलेल्या इमारतीत 20 हजार स्वेअरफूट जागा यासाठी देण्यात येणार आहे. या उपकेंद्राला भारतरत्न पी.व्ही.काणे यांचे नाव देण्यात येणार आहे.

रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड मध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला. रत्नागिरीत मुंबई विद्यापीठ उपकेंद्रातच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच लोकमान्य टिळकांचे अभ्यासक्रम केंद्रही मुंबई विद्यापीठातच सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय रत्नागिरीतील पॉलिटेक्नीक कॉलेजचा पूर्णपणे चेहरामोहरा बदलण्यात येणार असून ही इमारत विकसित केली जाईल. याचठिकाणी इंजिनियरींग कॉलेज सेंटरही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.