अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज बहुप्रतिक्षित सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करतील. कोरोना काळात आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या प्रत्येक सामान्य व्यक्तीचे या बजेटकडे लक्ष्य आहे. यासह आर्थिक पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि शेजारच्या देशांच्या वाढत्या संघर्षादरम्यान संरक्षण क्षेत्रावरील खर्च वाढवून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे. कोरोना काळात आरोग्य विभागासाठी विशेष तरतुदी या अर्थसंकल्पात केल्या जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमिवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात एक विशेष तरतूद करण्याची विनंती केंद्राकडे केली आहे. त्यांनी कोरोना लसीकरण मोफत केले जावे अशी मागणी केली आहे. 

देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम (Coronavirus Vaccination Drive) सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरण सध्या सुरू आहे. यामध्ये कोरोना योद्धा, पोलीस, डॉक्टर्स इ. अशा फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यानंतर वृद्ध आणि आजारी नागरिकांना लस दिली जाईल. त्यानंतर पुढील लसीकरणाचा टप्पा आखला जाईल. पहिल्या टप्प्यातील खर्च केंद्र सरकार उचलणार असून, पुढील खर्च देखील कोट्यवधींच्या घरात आहे. त्या खर्चाचा भार सामान्यांवर पडू नये याकरता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही मागणी केली आहे. मोफत लसीकरणाची तरतूद या राजेश टोपेंच्या मागणीला अनेकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

मीडिया अहवालनुसार, राजेश टोपेंनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, लसीकरणाचा कार्यक्रम देशपातळीवरच राबण्यात आला पाहिजे. जर याकरता पैसे द्यावे लागले तर अनेक नागरिक लस घेणार नाहीत आणि त्यामुळे दुष्परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे गरींबासाठी लसीकरण मोफत व्हायला हवे अशी मागणी राजेश टोपेंनी केली आहे.