करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांच्या ठिकाणी संख्येवर मर्यादा राहील, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

रुग्णसंख्या वाढत असल्याने भविष्यात ही परिस्थिती गंभीर होऊ नये, यासाठी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. अन्यथा पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असे राव यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.कोचिंग क्‍लासेसच्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून मास्कचा वापर आणि सुरक्षित वावर ठेवण्यात येत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित कोचिंग क्‍लास चालकांनी घेण्याचेही त्यांनी सुचविले आहे.