थकीत बिलापोटी वीज पुरवठा खंडीत केल्याचा जाब विचारत शहरातील महावितरण कंपनीचे कार्यालयात तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांच्यासह 9 जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, सर्वच संशयितांना दुपारी मोठेतळे येथून न्यायालयापर्यंत चालवत नेल्याने संतप्त मनसे जिल्हा संपर्कप्रमुख जयराज लांडगे यांनी या प्रश्‍नी पोलिस अधिकार्‍यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर पोलिसांकडून गाडी बंद पडल्याचे कारण सांगण्यात आले.  तर गुन्हा दाखल झालेले पदाधिकारी न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सर्वांवर फुलांची उधळण करत स्वागत केले.

लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील एकाचा वीज पुरवठा खंडीत केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाब्दिक वादानंतर महावितरण कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली. या हल्ल्यात महावितरण कार्यालयाचे मुख्यप्रवेशद्वारासह खिडक्या आणि कॅश काऊंटरच्या काचा फोडण्यात आल्याने कार्यालयात काचांचा खच पडला होता.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, योगेश दाभोळकर, साहिल कोकटनूर, कृष्णा कोपार्डे, सुभाष शेंडे, रोहित कोतकर, वरद फातले, बबलू उर्फ प्रशांत कांबळे आणि प्रमोद भाटले या नऊजणांना अटक केली. या सर्वांवर सरकारी मालमत्तेचे नुकसान, सरकारी कार्यालयात दहशत निर्माण करणे, सरकारी नोकरांवर हल्ला यासह विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अटक केलेल्या सर्वांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.