प्रक्रिया करणारी यंत्रणाच बंद असल्याने औद्योगिक सांडपाणी विनाप्रक्रिया थेट काळ्या ओढ्यात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी सामुहिक औद्योगिक सांडपाणी प्रकल्प (सीईटीपी) यांच्या निष्काळजीपणाबद्दल राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडेच तक्रार करणार असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी दिली.

इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असल्याने याठिकाणी अनेक प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. विशेषत: सायझिंग, प्रोसेस यातून कापडावर प्रक्रिया केल्यानंतर बाहेर सोडले जाणारे रसायनमिश्रित सांडपाणी हे एकत्र करुन त्यावर प्रक्रिया करुन ते काळ्या ओढ्यात सोडले जावे. जेणेकरुन प्रदुषणाची तीव्रता कमी होण्यासह शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून व नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात सामुहिक औद्योगिक सांडपाणी प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यात आला.

हा प्रकल्प शहरातील उद्योगांसाठी संजीवनी ठरला होता. परंतु गत काही वर्षांपासून या प्रकल्पाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. त्या तक्रारींच्या अनुषंगाने पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक शशांक बावचकर, राजू आलासे व अधिकार्‍यांनी सीईटीपीला प्रत्यक्ष भेट देऊन तसेच परिसरातील काळ्या ओढ्याची पाहणी करुन माहिती घेतली.