ऑनलाइन टिम:

राज्यात उतारणीला लागलेला करोना (covid) रुग्णसंख्येचा आलेख या आठवडय़ात पुन्हा वर गेला आहे. यात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्य़ात आठवडाभरात पाच टक्के रुग्ण वाढले आहेत. अमरावतीमधील १०० रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांसाठी पाठविले असून याचा अहवाल पुढील आठवडय़ात येणार आहे.राज्यात शुक्रवारी दिवसभरात तीन हजार ६७० नव्या रुग्णांचे निदान झाले. तर दोन हजार ४२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत हा आलेख घसरत अडीच हजारांपर्यंत आला होता.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच यात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून आले. मागील चार दिवसांपासून तर दर दिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची (Patient) संख्या सुमारे तीन ते साडेतीन हजारांपर्यंत पोहोचली आहे.अमरावती शहर आणि ग्रामीण भागात फेब्रुवारीपासून (covid)  रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या आठवडय़ात अमरावती महानगरपालिकेत ६९०, तर ग्रामीणमध्ये २७८ रुग्णांचे नव्याने निदान झाले होते, तर ५ ते ११ फेब्रुवारी या आठवडय़ात हे प्रमाण अनुक्रमे १०७८ आणि ३६० वर पोहोचले आहे. अमरावती शहरात आठवडाभरात सुमारे सात टक्के, तर ग्रामीणमध्ये सुमारे चार टक्के रुग्णवाढ झाली आहे. 

------------------------------

Must Read

-------------------------------

झपाटय़ाने वाढलेल्या संसर्गामागे नवकरोनाचे विषाणू कारणीभूत आहे का याची पडताळणी करण्यासाठी बाधितांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्य़ात तपासण्या सुरू केल्या आहेत.अमरावती शहरी भागात रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसत आहे. एका वेळी संपूर्ण कुटुंबच पूर्ण बाधित असल्याचे तपासणीत दिसून येत आहे. या दृष्टीने अधिक अभ्यास करण्यासाठी चार दिवसांत राज्याचे आरोग्य अधिकारी येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रानमाळे यांनी दिली.

राज्यातील इतर महापालिकांतील स्थिती

अकोला ग्रामीण भागातही रुग्णवाढ झाल्याचे आढळले असून दर आठवडय़ाला नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ७४ हून ११३ वर पोहोचली आहे, तर वर्धामध्ये २५२ हून २८१ पर्यंत वाढली आहे. दर आठवडय़ाला (covid) एक हजाराहून अधिक रुग्णसंख्या आढळणाऱ्या जिल्ह्य़ांमध्ये (districts) सध्या मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती जिल्ह्य़ांचा समावेश आहे. सोलापूर, मिरज, औरंगाबाद, परभणी, नांदेड, वर्धा, पनवेल, धुळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भागांतही या आठवडय़ात रुग्ण वाढले आहेत.राज्यात ज्या भागांमध्ये आधी संसर्ग प्रसार अधिक झाला नव्हता तिथे आता संसर्ग होताना दिसत आहे. प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्या आणि संपर्कातील व्यक्तींचा शोध यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत. अमरावतीमधील १०० बाधितांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविले आहेत. याचे अहवाल या आठवडय़ात येतील.