aniket murder case

पोलिस कोठडीमधून अनिकेत आणि मी पळून गेलो होतो. 'अनिकेत कुठे आहे ते माहीत नाही. कोणी विचारले तर असेच सांगायचे. तसे सांगितले नाहीस तर अनिकेतसारखे तुलाही मारून टाकीन', अशी धमकी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने दिली होती. त्यावेळी त्याने माझ्या डोक्याला पिस्तूल लावले होते, अशी साक्ष अनिकेत कोथळे खून (murder case) प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याने सोमवारी न्यायालयात दिली.

कोरोनामुळे खंडित झालेली कोथळे खूनप्रकरणाची सुनावणी सोमवारपासून प्रधान जिल्हा न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर सुरू झाली. पहिल्याच दिवशी या प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार आणि अनिकेतचा मित्र अमोल भंडारे याची साक्ष नोंदवण्यात आली.

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी त्याची साक्ष घेतली. दरम्यान, मंगळवारी बचाव पक्षाचे वकील त्याचा उलट तपास घेणार आहेत.

---------------------------------------
Must Read

1) मोक्यातील चंद्रकांत लोहार याला जामीन

2) पालिकेची आज ऑनलाइन विशेष सभा

3) हातकणंगले तालुक्‍यात नऊ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांना कौल

---------------------------------------

भंडारे न्यायालयासमोर म्हणाला, अनिकेत आणि मला कामटे याने चोरीप्रकरणी अटक केली होती. त्याच दिवशी रात्री आठच्या सुमारास आम्हाला कोठडीतून बाहेर काढले. त्यावेळी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यांनी आम्हाला दोघांनाही 'कुठे चोरी केली' ते विचारले. त्यानंतर कामटेला या प्रकरणाची चौकशी (murder case) करण्यास सांगून त्या निघून गेल्या.

काळे निघून गेल्यानंतर कामटेने आम्हाला दोघांना कोठडीजवळील खोलीत नेले. तेथे अरूण टोणे, अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरूद्दीन मुल्ला, झाकीर पट्टेवाले थांबले होते. त्यानंतर कामटेने खोलीचा दरवाजा बंद करून आम्हाला रबरी पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्ही दोघांनीही गयावया केली; मात्र कामटेने काही ऐकले नाही. त्यानंतर कामटेने आम्हाला कपडे काढण्यास सांगितले.

कपडे काढल्यानंतर मला अनिकेतचे हातपाय दोरीने बांधायला सांगितले. अनिल लाडने माझे हातपाय दोरीने बांधले. नंतर कामटेच्या सांगण्यावरून अनिकेतला उलटे टांगायला सांगितले. नंतर त्याला दोन बुरखे घातले. त्यानंतर त्याचे तोंड पाण्याच्या बादलीत बुडवले. कामटेच्या सांगण्याप्रमाणे टोणे, लाड, पट्टेवाले यांनी दोरी हळूहळू सोडली. डोके पाण्यात बुडाल्यानंतर अनिकेत तडफडत होता. 'श्वास गुदमरतोय बुरखा काढा' असे तो म्हणत होता असेही भंडारे याने यावेळी न्यायालयात सांगितले.

सर्व संशयितांना ओळखले

न्यायालयात साक्षीवेळी भंडारे याला संशयितांना ओळखतोस का असे विचारण्यात आले. त्यानंतर त्याने युवराज कामटे, अरूण टोणे, अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरूद्दीन मुल्ला, झाकीर पट्टेवाले यांना ओळखले. शिवाय मारहाण करताना वापरलेल्या बादली, प्लास्टीकची पाईप या वस्तूही त्याने ओळखल्या.

कारमधून साडेतीन तास प्रवास

भंडारे याने साक्षीत (Witnessed) दिलेली माहिती अशी ः अनिकेतने श्वास गुदमरतोय असे सांगितले. नंतर काही वेळाने त्याची हालचाल थांबली. त्यानंतर त्याला खाली काढले. मला त्याच्या पाठीवर बसायला सांगून मुल्ला व शिंगटेने मारहाण केली. त्यावेळी कामटेने अनिकेतचे डोके गुडघ्याने दाबत 'आता तुझा जोर दाखव, ताकद संपली का' असे विचारले. अनिकेत निपचित पडल्याचे पाहून लाड याने त्याचे शरीर थंड पडल्याचे सांगितले. नंतर दोघांनाही खोलीबाहेर काढले. तेथून दुचाकीवरून मुल्लाने मला नदीकाठावर नेले. तेथे एक पोलिस गाडी आणि कार आली. पोलिस गाडीतून अनिकेतचा मृतदेह काढून त्या कारमध्ये पुढे ठेवला. नंतर मला डिकीत बसायला सांगितले. नंतर कामटे, लाड, टोणे यांच्यासह आम्ही साडेतीन तास प्रवास केला.

मृतदेह जळाल्याचा वास आला...

भंडारेने साक्षीत (Witnessed) दिलेली माहिती अशी ः साडेतीन तास प्रवास केल्यानंतर कार थांबली. तेथे मला मृतदेह जळाल्याचा वास आला. त्यानंतर लाड, टोणे, कामटे कारमध्ये येऊन बसले. त्यावेळी टोणे याने 'हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीत तुलाही असेच मारून टाकू' अशी धमकी दिली. त्यानंतर कामटेनेही पिस्तूल डोक्याला लावून धमकी दिली. 'आम्ही दोघे पोलिस कोठडीतून पळून गेलो होतो. मी निपाणीला गेलो तर अनिकेत कुठे गेला मला माहित नाही असे सांग' म्हणून कामटेने धमकी दिली. जर असे सांगितले नाही तर गोळ्या घालून तुला ठार करू असे कामटे म्हणाला.