request-beneficiaries-ichalkaranji-take-grain

(ration card) "हॅलो ! तुमचे धान्य आले आहे. घेऊन जा', अशी विनंती धान्य दुकानदार इचलकरंजीत लाभार्थ्यांना करत आहेत. अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेले केशरी शिधापत्रिका (ration card) लाभार्थी धान्य उपलब्ध होऊनही याकडे पाठ फिरवत आहेत. केवळ 54 टक्के धान्य पुरवठा विभागाकडे आल्याने वाटपाचा पेच निर्माण झाला होता; मात्र आता धान्य शिल्लक राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या केशरी शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू याप्रमाणे सवलतीच्या दरात शासनाने धान्य वाटप जाहीर केले आहे. कोरोनात या धान्यासाठी लाभार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. त्यानंतर तब्बल 5 महिन्यांनी जुलैचे धान्य शासनाने डिसेंबरमध्ये जाहीर केले.

शहरातील 1 लाख 74 हजार 475 लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी गहू 3 किलोप्रमाणे 5234.25 क्विंटल व प्रति लाभार्थी तांदूळ 2 किलो याप्रमाणे 3489.50 क्विंटल आवश्‍यक होते; मात्र जुलैचा प्रत्यक्षात पुरवठा विभागाला गहू 2851.50 क्विंटल व तांदूळ 1900.50 क्विंटल प्राप्त झाला. आवश्‍यक धान्यापैकी केवळ 54 टक्के धान्यसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे उर्वरित 46 टक्के लाभार्थ्यांना धान्य वाटपाचा पेच निर्माण झाला. गुंतागुंतीच्या या वाटपात अखेर उपलब्ध धान्य वाटप करण्याचे पुरवठा विभागाने निश्‍चित केले.

केवळ 4 ते 5 दिवसांत हे धान्य वाटप संपवून शिल्लक लाभार्थ्यांच्या मागणीनुसार (ration cardआणखी धान्य उपलब्ध करण्याच्या तयारीत पुरवठा विभाग होता; परंतु कमी धान्य उपलब्ध होऊनही 13 दिवस उलटले तरी केशरी लाभार्थ्यांचा प्रतिसाद दिसलेला नाही. 
कमी धान्याचा कोटा उपलब्ध झाल्याने तत्काळ संपूर्ण धान्य पुरवठा होईल, अशी आशा धान्य दुकानदारांना होती. कोरोनात रोजगार बुडाल्याने केशरी कार्डधारक धान्यासाठी धावले; मात्र सर्व सुरळीत झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष करत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. अद्याप शहरातील धान्य दुकानात केशरी कार्डधारकांचे धान्य शिल्लक आहे. वेळीच लाभार्थ्यांनी धान्याची उचल करणे गरजेचे आहे. 

दुकानदारांना त्रास 
सध्या नियमित धान्य वाटप पूर्ण करून केवळ केशरी कार्डधारकांच्या धान्य वाटपासाठी धान्य दुकाने उघडावी लागत आहेत. काही दुकानांत प्रतिसाद कमी आहे, तर अनेक दुकानदार फोन करून लाभार्थ्यांना विनंती करत आहेत. त्यामुळे हे धान्य वाटप दुकानदारांना त्रासदायक बनले आहे.