(Bird Flu) राजस्थान, मध्य प्रदेशमार्गे राज्याच्या सीमेलगत बर्ड फ्लूची साथ आली. स्थलांतरित पक्ष्यांबरोबर कोंबड्यांचा जीव धोक्‍यात आला. आरोग्य विभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या, तर काहींनी चिकन, अंडी खाण्यावर मर्यादा घातल्या. अशा स्थितीत जिल्ह्यात एकाही पक्ष्याला बर्ड फ्लूची (Bird Flu) लागण झाल्याचे आढळलेले नाही, असे मत वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राचे डॉ. संतोष वाळवेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

बारा वर्षांपूर्वी उत्तर महाराष्ट्रात बर्ड फ्लूची साथ आली. पोल्ट्रीतील लाखो पक्षी मृत्युमुखी पडले. लोकांनी चिकन, अंडी वर्ज्य केले. तोच प्रकार काही जिल्ह्यात आताही सुरू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. वाळवेकर म्हणाले, ‘‘पक्षी तोंडाने श्‍वास घेऊ लागतात, त्यांच्या तोंडाला विशिष्ट स्त्राव येतो. त्यांची प्रकृती खालावून ते मृत्युमुखी पडतात. अशी साधारण लक्षणे बर्ड फ्लूमध्ये दिसतात.

स्थलांतरित पक्ष्यांमधून बर्ड फ्लूची साथ येत आहे. शेकडो पक्ष्यांच्या कळपात अनेक पक्ष्यांना लागण झाली की, त्यांचा मृत्यू होऊ लागतो. त्याचा संसर्ग माणसांनाही होऊ शकतो, मात्र त्याची तीव्रता रोगप्रतिकारकशक्तीनुसार कमी-अधिक असू शकते. जिल्ह्यात सध्या स्थलांतरित पक्षी आले आहेत; (Bird Flu) मात्र अशा पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे नाहीत किंवा एका वेळी जास्त संख्येने मृत्यू झाले, अशी घटनाही दिसत नाही. शहरातील तलावांकाठी तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात स्थलांतरित पक्षी आले तरीही प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.’’

काही प्राथमिक लक्षणे

  • बर्ड फ्लू झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवस पक्षी क्षीण होतात. त्यांच्या स्थलांतरावर मर्यादा येतात. त्यामुळे परप्रांतातील बर्ड फ्लू अजून कोल्हापुरात आल्याची चिन्हे नाहीत.
  • पक्ष्यांच्या तोंडातील स्त्राव, विष्ठा यातून संसर्ग  होतो. पोल्ट्रीत एका वेळी जास्त संख्येने कोंबड्या असल्याने त्यांच्यात संसर्ग जास्त पसरू शकतो. त्यामुळे अशा कोंबड्यांची वाहतूक तूर्त थांबविणे गरजेचे आहे.
  • एखादा पक्षी क्षीण झाला असल्यास त्याला थेट हात न लावता त्याची माहिती वनविभागाला द्यावी.