ichalkaranji-crime-news

(Crime news) इचलकरंजी येथे विविध गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील घरफोडी, चोरी व लुटमार असे तीन गुन्हे (Crime news)  उघडकीस आणण्यात यश आले आहे. या प्रकरणी एका अल्पवयीनसह पाचजणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.

इचलकरंजी शहरातील जवाहरनगर, जयभवानी कॉर्नर कबनूर व शाहू हायस्कूल परिसरात झालेल्या गुन्ह्यांची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली होती. यासह विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने 13 जानेवारी रोजी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आले. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी राबविलेल्या या ऑपरेशनमध्ये 4 पोलिस अधिकारी, 30 पोलिस अंमलदार, व 30 होमगार्ड अंमलदार आदी सहभागी झाले होते.

9 जानेवारी 2021 रोजी हनुमानगर जवाहरनगर परिसरातील सोनाली सचिन जाधव यांच्या राहत्या घराचे कुलूप उचकटून चोरट्याने सोन्याची बोरमाळ व मोबाईल असा 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी मिळालेल्या माहितीवरुन सागर वसंत टिपुगडे (वय 23 रा. हनुमाननगर जवाहरनगर) याच्यासह एका अल्पवयीस मुलास अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

10 जानेवारी 2021 रोजी बागडीगल्ली कलानगर(Crime news)  परिसरातील दिनकर श्रीपती सुतके (वय 50) यांना गोसावी गल्लीतील तिघांनी किरकोळ कारणावरुन शाहू हायस्कूल परिसरात लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सुतके यांच्याकडील 5 हजार 500 रुपयांची रोकड, एटीएम कार्ड, आधार कार्ड जबरदस्तीने चोरुन नेले होते. या प्रकरणी आकाश केशव माळी (वय 30), पांडुरंग लक्ष्मण सोनटक्के (वय 48 दोघे रा. गोसावी गल्ली) यांना अटक करण्यात आली आहे.

11 जानेवारी 2021 रोजी जयभवानी कॉर्नर कबनूर येथील बाळकृष्ण रविंद्र गरड यांच्या घरातून अज्ञाताने 50 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप चोरुन नेला होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी रजनेश मोहन सोनार (वय 22 रा. कबनूर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीचा लॅपटॉपही हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस निरिक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरिक्षक प्रमोद मगर, रफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतारी, प्रकाश कांबळे, महेश पाटील, गजानन बरगाले, अविनाश भोसले व विजय माळवदे यांच्या पथकाने केली.