ichalkaranji-crime-news

(Crime) इचलकरंजी येथील लायकर मळ्यातील गोठ्यामध्ये झालेल्या उत्तम राजाराम चौगुले (वय 46) याच्या खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे (Crime)  शाखेला यश आले आहे. या प्रकरणी नजीर रशिद मुल्लाणी (रा. लिंबू चौक) याला अटक करण्यात आली असून दारु उधार देण्यास नकार दिल्याच्या कारणातून उत्तम चौगुले याचा गळा चिरल्याची कबुली त्याने दिली आहे, अशी माहिती पोलिस उपअधिक्षक बी. बी. महामुनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लायकर मळा परिसरात संजय लायकर यांच्या मालकीचा जनावारांचा गोठा आहे. या गोठ्याची व जनावरांची  निगा राखण्याचे काम उत्तम चौगुले हा करीत होता. तो राहण्यासही तेथेच होता. गुरुवार 29 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून चौगुले हा गोठ्यातच झोपला होता. रात्रीच्या सुमारास अज्ञाताने त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरला होता. ही घटना समजल्यानंतर संजय लायकर यांनी तातडीने चौगुले याला येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला सांगली येथे दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना 7 नोव्हेंबर रोजी चौगुले याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या खूनाचे नेमके कारण समजू न शकल्याने तपास कामात अडचणी येत होत्या.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधिक्षक महामुनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव यांनी या खूनाचा तपास सुरु केला होता. तपासादरम्यान खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीवरून संशयित नजीर मुल्लाणी याला चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले होते. त्यानंतर तपास सुरु असताना पुन्हा मुल्लाणी याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चौगुले याचा खून केल्याची कबुली दिली. मुल्लाणी हा चौगुले याच्याकडे दारु पिण्यासाठी जात होता. (Crime) त्यातून चौगुले याने मुल्लाणी याला उधार दारु देत होता. घटनेच्या दिवशी मुल्लाणी हा चौगुले याच्याकडे दारु पिण्यासाठी गेला होता. परंतु चौगुले याने उधार दारु देण्यास नकार दिला. त्या रागातूनच रात्रीच्या सुमारास मुल्लाणी याने गोठ्यात झोपलेल्या चौगुले याचा कटरने गळा चिरला होता.

या क्लिष्ट प्रकरणाचा छडा लावण्यात तब्बल दोन महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पत्रकार बैठकीस पोलिस निरिक्षक श्रीकांत पिंगळे, इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक भागवत मुळीक आदी उपस्थित होते.