cricket-harbhajan-singh-trolled-for-his-tweet-on-coronavirus

(Live Score) ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) नेहमी त्याचे ट्विट्स आणि वक्तव्यासाठी चर्चेत असतो. यावेळी हरभजननं केलेल्या गोष्टीमुळे त्याला सार्वजनिक माफी मागावी लागली आहे. हरभजननं एक ट्वीट केलं होतं, त्यानंतर त्याच्यावर माफी मागण्याची नामुष्की ओढावली आहे.

काय आहे प्रकरण?

हरभजन सिंगनं नुकतंच एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये त्यानं भारतीय नेते कोरोना व्हॅक्सिन (Corona Vaccine) घेत नाहीत, फक्त फोटो काढण्यासाठी नाटक करतात असा दावा केला होता. त्याचा हा दावा खोटा निघाला. त्यामुळे हरभजन अडचणीत सापडला.

हरभजननं केलेल्या ट्वीटमध्ये त्यानं म्हंटलं होतं की, 'वास्तविक आमचे नेते या पद्धतीनं व्हॅक्सिन घेत आहेत. फोटो निघाला. ओके गुड.' एका व्हायरल व्हिडीओच्या (Viral Video)  आधारावर हरभजननं हे ट्विट केलं होतं. या व्हिडीओमध्ये एक महिला आणि एक पुरुष व्हॅक्सिन घेताना फोटो काढत होते. त्यांनी फक्त कोरोना व्हॅक्सिन घेण्याचं नाटक केलं आणि फोटो काढला. असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात येत होता. (Live Score) या व्हिडीओतील बातमी खोटी असल्याचं थोड्याच वेळात सिद्ध झालं.

कर्नाटकातील तुमकुरुचे (Tumakuru)  डेप्युटी कमिनशन राकेश कुमार यांनी एका वेबसाईटशी बोलताना या व्हिडीओचं सत्य सांगितलं. ‘ज्या दोन जणांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ते डॉ. रजनी आणि डॉ. नागेंद्रप्पा आहे. त्यांनी कोरोना व्हॅक्सिन घेतले होते. त्यानंतर पत्रकारांच्या आग्रहासाठी त्यांनी तो फोटो काढला होता. तो फोटो काढण्यापूर्वीच त्यांनी व्हॅक्सिन घेतलं होतं,’ असं राकेश कुमार यांनी सांगितलं.

हरभजननं मागितली माफी

या व्हिडीओचं सत्य समोर आल्यानंतर हरभजननं माफी मागितली. या विषयावर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. एका फॅननं तर त्याच्यावर देशाची बदनामी करण्याचा आरोप केला. हे ट्विट करण्यापूर्वी फॅक्ट चेक (Fact Check) केली नसल्याचं हरभजननं मान्य केलं आहे.