
(election 2021) महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणुकीची आरक्षण सोडत झाल्यानंतर इच्छुकांच्या मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तशी प्रभागात तरूणांची टोळकी वाढू लागली आहेत. निवडणुकीतील इर्षा, संघर्षातून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात पेट्रोलिंग वाढविण्याचे आदेश दिले आहेत, असे शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
महानगरपालिकांना निवडणुकीच्या आरक्षण सोडतीनंतर तर इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरवात केली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा निमित्त्यांने अशा इच्छुकांच्या फलकांची गर्दी झाली आहे. सायंकाळनंतर शहर परिसरात टोळक्यांचीही संख्या वाढू लागली आहे. चर्चेतून टोळक्यांत इर्ष्या, संघर्ष निर्माण होण्याची व त्यातून हामामाऱ्यासारखे प्रकार घडण्याचे धोके वाढू लागले आहेत. शहर पोलिस उप-अधीक्षक चव्हाण यांनी गैरप्रकारावर अंकूश ठेवण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यांनी शहरातील चारही पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना हद्दीतील पेट्रोलिंग (गस्त) वाढण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वीच्या निवडणूक काळात वाद, मारामारीसारखे प्रसंग घडले आहेत, (election 2021) अशा ठराविक भागात विशेष लक्ष ठेवा, रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या खुल्या पार्ट्या, ओपन बार, अवैध धंद्यासह रेकॉर्डवरील, स्थानबद्ध, हद्पार केलेल्या गुन्हेगारांवर वेळीच कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार सायंकाळनंतर हद्दीतील गस्त वाढविण्यावर भर देण्यास पोलिस ठाण्यांनी सुरवात केली आहे. त्यांच्याकडून या गस्तीचा आणि त्या अनुसरून केलेलया कारवाईचा दररोज आढावा घेतला जाणार आहे.