satej-patil-criticism-dhananjay-mahadik

(Kolhapur Politics) महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. गेली दहा वर्षे आम्ही एकत्र संसार करत असून यापुढेही आमचा हा संसार सुरु राहणार आहे. भांडणे लावण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना केले. केशवराव भोसले नाट्यगृहात नागट्यगृहाशी संबधित प्रश्‍नावर आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते. पारंपारिक प्रतिस्पर्धी महाडिक आता भाजपमध्ये आहेत,त्यांनी तेथेच रहावे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग वाजले असून आता दररोज या ना त्या घडामोडी घडत आहेत. सतेज पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांनी त्यांना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्याच जास्त जागा निवडून येतील, असा दावा केल्याचे सांगीतले. त्यावर सतेज पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि आम्ही गेली दहा वर्षे महापालिकेच्या राजकारणात एकत्र आहोत. (Kolhapur Politics) एकत्रपणे आमचा संसार सुरु आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकच आहोत. त्यामुळे कोणी किती जागा जिंकायच्या याची आमच्यात स्पर्धा नाही, ते महाविकास आघाडीचेच यश असणार आहे. त्यामुळे आमच्यामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करु नका. 


भाजपने टीका केल्याकडे लक्ष वेधले असता, सतेज पाटील म्हणालेत भाजपमध्येच अंतर्गद वाद आहेत. अगोदर त्यांचे वाद त्यांनी मिटवावेत, मग आमच्यावर टीका करावी. मूळची भाजप आणि आताची सुजलेली भाजप यामध्येही बरेच वाद आहेत.   

रस्त्यांसाठी 36 कोटीची कामे सुरु 
कोल्हापूर शहरातील रस्ते करण्यासाठी 36 कोटीचा निधी दिला आहे. पुर्वीचे 25 कोटी आणि आत्ताचे 11 कोटी असा तो निधी आहे. रस्ते नवे करणे हे 81 प्रभागात वाटून निधी दिला आहे. तर शहरातील महत्वाचे रस्तेही नव्याने करण्याचे काम सुरु आहे. पॅचवर्कसाठी दीड ते दोन कोटीचा निधी असून ही कामेही येत्या पंधरा दिवसात पुर्ण होणार आहे. 

कोव्हिडनंतर जादा बजेट 
जिल्ह्यात विविध विकासकामे करायची आहेत.पण सध्या कोव्हिडच्या परिस्थितीमुळे राज्यसरकारवर बऱ्याच मर्यादा येत आहेत. हळूहळू परिस्थिती सुधारत आहे, मार्चनंतर कांही ठोस निर्णय आपल्याला घेता येतील,असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.