
विद्यापीठामध्ये विविध विभागांतर्गत तात्पुरत्या कालावधीकरिता कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया केली जाते. मात्र या कामगारांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन दिले जात नाही अशा अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. याची दखल घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात आढावा घेतला.
उदय सामंत म्हणाले की, विद्यापीठामध्ये कुशल, अर्धकुशल, अकुशल गटामध्ये तात्पुरत्या कालावधीकरिता कंत्राटी कर्मचारी आणि कामगार काम करीत असतात त्यांना कामगार कायद्यानुसार वर्गवारीनुसार किमान वेतन मिळाले पाहिजे. मात्र काही विद्यापीठांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात (Education) नाहीत अशा तक्रारी आहेत. विद्यापीठांनी कामगार कायद्यानुसार त्यांना किमान वेतन द्यावे, त्यामुळे कामगारांच्या सध्याच्या वेतनापेक्षा किमान 4 ते 5 हजारांनी वाढ होऊन त्यांच्या हक्काचे वेतन मिळेल, असंही सामंत यांनी यावेळी सांगितलं आहे.
या बैठकीला कामगार विभागाचे आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके, बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु रामा शास्त्री, कुलसचिव डॉ.बी.एफ.जोगी, अधिष्ठाता डॉ. नलबलवार, सह सहयोगी अधिष्ठाता डॉ.जोशी आदी उपस्थित होते.