politics news ichalkaranjipolitics news- इचलकरंजी येथील पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होत आहेत, पण या निमित्ताने पालिकेचे (municipality) राजकारण अस्थिर होण्याच्या शक्‍यतेमुळे इच्छुक धास्तावल्याचे चित्र आहे. विरोधकांनी सत्तेत येण्यासाठी चाचपाणी करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे यावेळेच्या विषय समित्यांच्या निवडी चुरशीने होण्याची चिन्हे दिसत आहेत.

गत सभापती निवडीवेळी सत्तेत फेरबदल झाले होते. त्यामुळे यावेळी काय होणार, याचीच उत्सुकता आतापासून लागली आहे. अद्याप निवडीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झालेला नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या निवडी होणार आहेत. विद्यमान सत्ता कायम राहण्याची शक्‍यता गृहीत धरून इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे, पण सत्तेत फेरबदल होण्याची चर्चा होत असल्याने इच्छुक धास्तावले आहेत. या सभागृहातील सभापती होण्याची ही शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी सत्ता बदल होऊ नये, यासाठी आपले देव पाण्यात घालून ठेवले आहेत. 

शहराच्या बदलत्या राजकारणाचा परिणाम नवीन सभापती निवडीवर जाणवत आहे. सद्य:स्थितीत शहरातील राजकारणात कोण कोणाचा शत्रू हेच समजत नसल्यामुळे सगळेच गोंधळाचे वातावरण आहे. वर्षभरानंतर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यावेळी जनतेसमोर जावे लागणार आहे. त्याचाही विचार करण्यात येत आहे. पालिकेच्या (municipality) कारभाराविषयी जनतेमध्ये सकारात्मक मत नाही. त्यामुळे वर्षभरात पालिकेचा कारभार खरोखरच लोकप्रिय होईल काय, याची साशंकता आहे. त्यामुळे सत्तेत जायचे की नाही, याबाबत संभ्रमावस्थेतत वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळी आहेत. 

नेतेमंडळींचा लागणार कस 

वर्षभरानंतर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आतापासून विद्यमान नगरसेवकांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. परिस्थिती पाहून नजीकच्या काळात पक्ष व नेत्यांवरील निष्ठा बदलताना दिसल्यास आश्‍चर्य वाटू नये, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.