(Politics News) वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkarयांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकला होता.

या घटनेचा निषेध करण्यासाठी आज वंचित आघाडीच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव स्नेहल कांबळे यांनी प्रकाश आंबेकडर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये स्नेहल कांबळे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अंबरनाथमधील वंचित आघाडीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी त्या आक्षेपार्ह पोस्टवर प्रतिक्रिया देखील दिल्या.

दरम्यान, यानंतर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर दिलगिरी देखील व्यक्त केली. मात्र कायदेशीर कारवाई करण्याच्या (Politics News) मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत पोलिसांना निवेदन दिले.

याप्रकरणी सखोल चौकशी करून चार ते पाच दिवसात याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्त डि.डी.टेळे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र येत्या चार ते पाच दिवसांत सदर महिला पदाधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर अंबरनाथ शहर बंद करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे