coolie no 1movie review- गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक करण्यात आले आहेत. यात काही रिमेक हे बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले, तर काही मात्र सपशेल अपयशी ठरले. त्यातच आता गोविंदाचा ‘कुली नंबर 1’  हा १९९५ साली गाजलेला चित्रपट नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी ‘कुली नंबर 1’च्या (coolie no 1) रिमेकचं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरल्याचं दिसून येत आहे.

गोविंदा आणि करिश्मा कपूर यांचा ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट १९९५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यामुळे या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांची प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण झाली होती. अशातच या चित्रपटाचा रिमेक करुन तो पुन्हा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या पसंतीत उतरविण्याचं आव्हान डेव्हिड धवन यांनी स्वीकारलं आणि ते काही अंशी यशस्वीदेखील झाले. या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

---------------------------------------
Must Read

1) नृसिंहवाडीतील दत्त जयंती सोहळा रद्द

2) ...आणि 'पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं?'

3) Two wheeler : नवीन वर्षात दुचाकी महागणार

4) 2021 च्या वर्षात सर्वाधिक वेळा 'वीकएंड'लाच येणार संकष्टी चतुर्थी

-----------------------------------------

काय आहे चित्रपटाची कथा?

या चित्रपटाची कथा राजू (वरुण धवन) भोवती फिरत असून लहानपणी राजू रेल्वे स्टेशनवर हरवतो. त्यानंतर याच रेल्वे स्टेशनवर तो लहानाचा मोठा होतो. संपूर्ण आयुष्य रेल्वे स्टेशनवर काढल्यानंतर येथेच एक हमाल (कुली) म्हणून तो काम करतो आणि त्याच्या उदरनिर्वाहाची सोय करतो. विशेष म्हणजे प्रत्येकाला मदत करण्याची सवय, उदारपणा या त्यांच्या चांगल्या गुणामुळे त्याला नंबर १ चा बिल्ला दिला जातो. त्यामुळे त्याला कुली नंबर १ याच नावाने सगळे ओळखत असतात. 


राजू एक दिवस त्याच्या मित्रासोबत लग्नासाठी मुलगी पाहायला जातो. मात्र, तो कुली असल्यामुळे मुलीचे वडील या लग्नास नकार देतात. तर दुसरीकडे मात्र, जेफ्री रोजारिया ( परेश रावल) त्यांच्या मुलींसाठी सारा (सारा अली खान) आणि अंजू ( शिखा तलसानिया) यांच्यासाठी एका उत्तम स्थळाच्या शोधात असतात. परंतु, त्यांच्या अपेक्षा प्रचंड असतात. त्यामुळे त्यांनी पंडित जय किशन( जावेद जाफरी) यांचं स्थळ नाकारलं असतं. मात्र, आता लग्न करेन तर जेफ्रीच्याच मुलीशी अशी शपथ जय किशन घेतो. त्यानंतर या चित्रपटात नेमकं काय होतं?, सारा आणि राजूची भेट कशी होते हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना सगळी कोडी उलगडणार आहेत.

कलाकारांचा अभिनय कसा आहे?

आपल्या उत्तम अभिनयशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा वरुण धवन यावेळीदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास यशस्वी ठरला आहे. साहसदृश्य, संवाद कौशल्य आणि त्याची ओळख लपवण्यासाठी त्याने लढवलेल्या ना-ना शक्कल यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे. तुलनेने सारा अली खान प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालू शकली नाही. तिच्या भूमिकेत फारसं काही नाविन्य दिसून आलं नाही. तर परेश रावल, शिखा तलसानिया, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव यांनी उत्तमरित्या सहकलाकारांच्या भूमिका वाठविल्या आहेत.

दिग्दर्शन

एका गाजलेल्या चित्रपटाची (coolie no 1) कथा पुन्हा नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर सादर करण्यास डेव्हिड धवन यांना यश आलं आहे. करोनाच्या काळात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल असं दिसून येतंय. चित्रपटाच्या कथानकासोबत त्यातील गाणीदेखील तितकीच रंजक आहेत.