malpractice-in-nagpur-university

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) नुकत्याच झालेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घातल्याचा प्रशासनाने केलेला दावा फोल ठरला असून मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. हा गैरप्रकार शोधणारी विद्यापीठाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने कॉपीबहाद्दरांनी या उणिवांचा फायदा घेत कधी नव्हे ते ८० ते ९० टक्के गुण मिळवत गुणवंत विद्यार्थ्यांनाही पिछाडीवर टाकल्याचे दिसून आले.

-------------------------------------------------------

Must Read 
------------------------------------------------------------

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळायचा म्हणून विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेतली असली तरी परीक्षेतील तांत्रिक गोंधळ आणि उणिवांमुळेच परीक्षा चच्रेत राहिली. विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये अनेक वर्षांपासून उत्तीर्ण न होऊ शकलेले विद्यार्थी परीक्षा पद्धतीच्या उदार धोरणामुळे चक्क गुणवत्ता यादीत आले.

ऑनलाईन परीक्षे (Online exams) दरम्यान कुठलाही गैरप्रकार झाला तरी परीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून यावर करडी नजर ठेवली जाणार असून विद्यार्थी साधा स्क्रीन सोडून गेला, काही आवाज आला किंवा कुठलाही गैरप्रकार करताना दिसला तरी परीक्षा यंत्रणेकडे लगेच त्याची माहिती होईल आणि संबंधितावर कारवाई करण्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता.

मात्र, नुकताच हाती आलेल्या एका चित्रफीतीमध्ये काही विद्यार्थी पुस्तक उघडून परीक्षा देतानाचे दृश्य आहे. असा प्रकार अनेक ठिकाणी घडला असून प्रत्येक परीक्षेला काही विद्यार्थ्यांनी एकत्र बसून परीक्षा दिल्याची माहिती आहे. याशिवाय काही महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना यासाठी मदत केल्याची माहिती आहे. मात्र, या गंभीर प्रकारांवर विद्यापीठाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही हे विशेष. दरवर्षी होणाऱ्या परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर गैरप्रकार केल्यावर कारवाई होते. मात्र, ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार पकडणारी सक्षम यंत्रणा नसल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेत निकालात बाजी मारल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गैरप्रकार रोखणारी यंत्रणाच नाही

ऑनलाईन परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यापीठांद्वारे तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये कुठलीच यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, केवळ नागपूर विद्यापीठच नव्हे तर राज्यातील कोणत्याच विद्यापीठाद्वारे ते वापरण्यात आले नसल्याचे समजते. त्यामळे ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले असून निकालात ते दिसून आले.