ichalkaranji-interrogates-five-kalamba-jail-mobile

कळंबा कारागृह (Kalamba Jailप्रकरणाचे कनेक्‍शन इचलकरंजी असल्याच्या शक्‍यतेतून आज दिवसभर पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. एका नगरसेविकेच्या पतीसह पाचजणांची पोलिस कसून चौकशी करीत होते. संबंधितांचे नातेवाईक सध्या कळंबा कारागृहात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

कोल्हापूर येथील कळंबा कारागृहामध्ये मोबाईल, गांजा व इतर साहित्य टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील संशयितांचा पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील एका नगरसेविकेच्या पतीसह अन्य पाच जणांची चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. आज दिवसभर त्यांच्याकडे पोलिस तपास करीत होते. यामध्ये मोबाईल कॉलचे डिटेल्स, टॉवर लोकेशन यांसह विविध तांत्रिक बाजू पडताळण्याचे काम दिवसभर पोलिस यंत्रणा करीत होती. 

मात्र यातून कोणतीच ठोस माहिती अद्याप मिळाली नसल्याचे पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सांगितले. मुळात इचलकरंजीतील अनेक गुन्हेगारी टोळ्यांना मोका लावण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे शंभरावर संशयित कारागृहात आहेत. त्यांच्या संबंधित कोणी कळंबा कारागृह घटनेशी कनेक्‍शन असावे काय,(Kalamba Jail) या शक्‍यतेतून ही पडताळणी करण्यात आल्याची माहिती आहे. यातूनच एका नगरसेविकेचा मुलगा कारागृहात असल्याने त्यांच्या पतीची चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर एका मोका प्रकरणातील संशयित आरोपीच्या भावाची व त्याच्या अन्य तीन मित्रांची चौकशी करण्यात आली आहे. तर अजून आणखी कांही जणांची चौकशी होण्याची शक्‍यता आहे. 

कारागृहातील गुंडाचा वाढदिवस ; चौघे ताब्यात 
कळंबा कारागृहात असलेल्या एका गुंडाचा वाढदिवस चार दिवसांपूर्वी होता. त्यानिमित्तांने त्याच्या समर्थकांनी कळंबा कारागृहाबाहेर एकत्र येवून वाढदिवस जल्लोषात साजरा केला होता. याची माहिती खबऱ्या मार्फत शिवाजीनगर पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या गुंडाच्या समर्थकांचा शोध आज दिवसभर सुरू होता. पैकी चौघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आल्याची माहिती पोलिसांतून देण्यात आली.