complaints-state-authorities-

 कोरोनानंतर पूर्वपदावर येऊ इच्छिणाऱ्या वस्त्रोद्योगाची (Textile industry) नुकसानीची मालिका सुरूच आहे. आता अनैसर्गिक केल्या जाणाऱ्या सूत दरवाढीमुळे यंत्रमागधारक अडचणीत आले आहेत. यामुळे काही यंत्रमागधारकांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योगाचा गैरफायदा घेऊन होणाऱ्या सूत दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक सूत व्यापाऱ्यांबरोबर यंत्रमाग संघटनांची बैठक घ्यावी, अशी मागणी यंत्रमाग संघटनांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडे केली. 

-------------------------------------------------------

Must Read 
------------------------------------------------------------

अनैसर्गिक सूत दरवाढीसंदर्भात प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. खरात यांच्या उपस्थितीत विविध यंत्रमागधारक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी वाढीव सूत दरवाढीविरोधात गाऱ्हाणे प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडले. 2010 नंतर यंदा पहिल्यांदाच सर्वाधिक सूत दरवाढ झाली आहे. त्यामुळे सूत दरवाढ हे नवीन संकट यंत्रमाग उद्योगासमोर उभे ठाकले आहे. सूताची कच्चा माल म्हणून आवश्‍यकता असते. स्थानिक व्यापाऱ्यांकडून या सूताचा पुरवठा केला जातो. मात्र सूत व्यापाऱ्यांकडून दोन महिन्यांपासून सूत दरामध्ये भरमसाठ वाढ केली जात आहे. परंतु त्याप्रमाणात कापडाला दर येत नसल्याने नुकसानीमध्ये कापड विकावे लागत आहे.

सूताचा साठा करून सूत व्यापारी सूत दरात भरमसाठ वाढ करीत आहेत. ही अनैसर्गिक सूत दरवाढ थांबवण्यासाठी विविध मुद्यांवर स्थानिक सूत व्यापारी व यंत्रमाग संघटनांची बैठक घ्यावी या मागणीचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले. सूत दरातील स्थानिक व्यापाऱ्यांकडून होणारी बेकायदेशीर वाढ नियंत्रणात आणण्यासाठी बैठक घेण्याचे आश्‍वासन प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी दिले. 
बैठकीस सतीश कोष्टी, पुंडलिक जाधव, सागर चाळके, प्रकाश मोरे, राजाराम धारवट, राजगोंडा पाटील, विनय महाजन, गोरखनाथ सावंत, पांडुरंग धोंडपुडे, विश्‍वनाथ मेटे, सुनील मेटे, विकास चौगुले, श्रीशैल कित्तूरे, विनोद कांकाणी, अमित गाताडे आदी उपस्थित होते. 

अन्य मागण्या 
- सूताचा काऊंट नियंत्रित ठेवणे 
- दैनंदिन कालावधीतील दरातील तफावत रोखणे 
- उशिरा पेमेंटवरील व्याज आकारणी थांबवणे 
- मागणी केलेल्या सूताचे बिल अदा करणे 
- वजनातील फरकावर नियंत्रण आणणे