हिंदुस्थानच्या कुरापती काढणाऱया चीनची सीमेवर खुमखुमी कायम असून अरुणाचल (Arunachal) जवळ तीन गावे निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपग्रहाच्या छायाचित्रांमुळे चीनची ही पुरघोडी स्पष्ट झाली आहे. या गावांतील नागरिकांचे इतर ठिकाणी स्थलांतर करून चीनने भूतान आणि हिंदुस्थानी सीमेलगत त्रिकोणी जंक्शनजवळ बुमला पासपासून 5 किमी अंतरावर ही गावे वसवली आहेत. भविष्यात अरुणाचलमध्ये घुसखोरी करण्यासाठी चिनी ड्रगॉनचा डाव असल्याचे बोलले जात आहे.

Must Read 

अरुणाचल प्रदेशावर आपला हक्क सांगणाऱया चीनने आता थेट हल्ला करण्याऐवजी गाव वसवून नवी शक्कल लढवण्यास सुरुवात केली आहे. यामागे चीनचे मोठे कटकारस्थान आहे. गावे वसवण्यामागे चीनचा भविष्यातील विस्तारवादी आणि घुसखोरीचा हेतू असल्याचे चीनविषयक संरक्षण तज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी स्पष्ट केले आहे. अरुणाचल सीमेवर वसवलेल्या गावांत चीनने तिबेटी, चिनी नागरिकांसह स्थायिक गुराख्यांचे पुनर्वसन केले आहे. हे करताना गावच्या मूळ नागरिकांना मात्र इतर ठिकाणी हलवले आहे. उपग्रहांनी यंदाच्या 28 नोव्हेंबरला पाठवलेल्या छायाचित्रातून हा प्रकार उघड झाला आहे. 17 फेब्रुवारी 2020 पर्यंत या भागात फक्त एकच चिनी गाव होते. तिथे आता आणखी दोन गावांची भर पडली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी चीनने घुसखोरीचा प्रयत्न केलेल्या डोकलामपासून ही गावे फक्त 7 किमी अंतरावर आहेत.

घुसखोरीसाठी गुराखी, पाळीव कुत्र्यांचा वापर

हिमालयीन सीमेवरून हिंदुस्थानात घुसखोरी करण्यासाठी गुराखी आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यांचा उपयोग करता येईल असा चीनचा डाव आहे. समुद्रातून घुसखोरी करण्यासाठीही चिनी लष्कर असाच चिनी मच्छीमारांचा उपयोग करते, असे संरक्षण तज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी सांगितले. ही घरे लाकडांनी तयार केलेली दिसत असून सोबत आणखी नवी 50 बांधकामे दिसत आहेत. या ठिकाणी लष्कराला दळणवळणाच्या सोयीसाठी उभारलेले रस्तेही दिसत आहेत.

अरुणाचल प्रदेश हिंदुस्थानचा अविभाज्य भाग

चीन अरुणाचल प्रदेशाच्या 65 हजार चौरस किमी भागाला तिबेटचा भाग मानत आलेला आहे. पण 1914मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या सिमला करारानुसार आखलेल्या मॅकमोहन रेषेनुसार अरुणाचल प्रदेश हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असल्याचे हिंदुस्थानने अनेकदा ठणकावले आहे. मात्र मॅकमोहन रेषा अमान्य करणारा चीन सतत अरुणाचलच्या भूभागावर आपला दावा सांगत आला आहे.