nine-lenders-raids-kolhapur

(Raid) कोरोना काळात थंडावलेली बेकायदेशीर खासगी सावकारांविरोधातील कारवाई सहकार विभागाने पुन्हा सुरू केली असून, आज एकाच दिवशी शहरातील एकासह जिल्ह्यातील नऊ सावकारांच्या घर, कार्यालयावर ‘सहकार’च्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात छापा (Raid) टाकला. कारवाईत सर्वच सावकारांच्या ताब्यातून आक्षेपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश, आर्थिक रजिस्टर असलेल्या नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत.

 या कारवाईने पुन्हा एकदा खासगी सावकारांत खळबळ उडाली आहे. यापूर्वी सहकार विभागाने खासगी सावकारी करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. कोरोना काळात कारवाई थंड पडली होती. सहकार विभागाने पुन्हा दाखल तक्रारींबाबत नऊ सावकारांच्या घर व कार्यालयावर (Raid) एकाचवेळी धाड टाकली. यात सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिस सहभागी झाले होते.

उमेश हिंदूराव काशीद (रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर), रमेश आनंदराव कुंभार, रमेश तुकाराम पडीयार, श्रीधर अर्जुन गुरव (तिघेही रा. जयसिंगपूर), रोहित विजय पाटील (रा. हारोली, ता. शिरोळ), अण्णासाहेब बाळासाहेब पाटील (रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ), शिवगोंडा सिद्धगोंडा पाटील (रा. तारदाळ, ता. हातकणंगले), दीपक बाळू खोत (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) व संजय श्रीपती भांदिगरे (रा. पुंगाव, ता. राधानगरी) अशी कारवाई झालेल्या सावकारांची नावे आहेत. यातील भांदिगरे, काशीद व खोत वगळता इतरांच्या घर, कार्यालयातून आक्षेपार्ह कागदपत्रांसह कोरे धनादेश, नोंदी आढळून आल्या आहेत. 

जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. त्यात सहायक निबंधक प्रेमदास राठोड, बाळासाहेब पाटील, नारायण परजणे, सहकार अधिकारी नितीन माने, ए. पी. खामकर, आर. जे. कुलकर्णी, कृष्णा ठाकरे, शहर उपनिबंधक पी. एल. जगताप यांच्यासह ४१ कर्मचारी व १८ पोलिस होते.

चौथी कारवाई

आतापर्यंत जिल्ह्यात सहकार विभागाने चारवेळा कारवाई करून २४ सावकारांच्या घर व कार्यालयावर छापा टाकला होता. यापैकी १२ जणांवर ते राहात असलेल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा नोंदवण्यात आला असून, उर्वरित १५ जणांची चौकशी सुरू आहे. 

राजारामपुरीतील कारवाई गुलदस्त्यात
सहकार विभागाने राजारामपुरीतील एका समाजिक कार्यकर्त्याच्या घरावरही आज धाड टाकल्याचे वृत्त आहे. तथापि सहकार विभागाने अशी कारवाई झाली नसल्याचे सांगितले; पण संबंधितांच्या घरात पोलिस व सहकार विभागाचे अधिकारीही होते. त्यामुळे ही कारवाई गुलदस्त्यात ठेवण्यात आली की काय ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

कारवाईत सापडलेली कागदपत्रे
  रमेश कुंभार (जयसिंगपूर) - नोंदी असलेल्या सहा डायऱ्या, २० कोरे धनादेश, चार कोरे स्टॅम्प, गाडीची कागदपत्रे
  रमेश पडीयार (जयसिंगपूर)- दुचाकी आरसी बुक, ३ करारपत्रे, १ कोरा स्टॅम्प, ६ कोरे धनादेश
  श्रीधर गुरव (जयसिंगपूर)- तक्रारदाराचा कोरा धनादेश, आर्थिक नोंदीची तीन रजिस्टर
  रोहित पाटील (हरोली) - ५२ कोरे धनादेश, ४० कोरे स्टॅम्प
  आण्णासो पाटील (धरणगुत्ती)- भिशी नोंदी, १५ कोरे धनादेश, उसनवार पैसे पावत्या, गाड्यांची कागदपत्रे, आक्षेपार्ह आठ डायऱ्या
  शिवगोंडा पाटील (तारदाळ) - कोरे धनादेश, खरेदी दस्त, पाच करारपत्रे, डायरी
  दीपक खोत (खोतवाडी), उमेश काशीद, संजय भांदिगरे - काही सापडले नाही.