gold-price-incresed-28-per-cent-in-2020

(Gold Rate) यंदा जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या (Corona Virus Pandemic) साथीमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था आणि वाढलेल्या महागाईमुळं सोन्याच्या मागणीत  वाढ झाली आहे. महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक पाहायला मिळाली. त्यामुळं यंदा सलग दुसऱ्या वर्षी सोन्याच्या भावात तेजी दिसत आहे. 2019 मध्येही सोन्याच्या दरात दुहेरी अंकांची वाढ झाली होती. यावर्षी भारतात सोन्याचे दर 28 टक्क्यांनी वाढले आहेत. जागतिक पातळीवर सोन्याच्या दरातील वाढ 23 टक्के आहे. पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्येदेखील सोन्याच्या भावातील ही झळाळी कायम राहील.

मार्चनंतर सोन्याच्या किंमतीचा ग्राफ चढता

या वर्षी पहिल्या दोन महिन्यात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली होती. मात्र मार्चनंतर जगभरात कोरोना विषाणूचे संक्रमण झाले. त्यानंतर सोन्याच्या दरातही वाढ होऊ लागली. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर प्रति तोळा 56 हजार 200 रुपये झाला होता. जाणकारांच्या मते, जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. मध्यवर्ती बँकांनी लिक्विडिटीबाबत केलेल्या उपाययोजनांमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूकीला प्राधान्य दिलं. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक चांगला पर्याय मानला जातो.

ऑगस्टनंतर 10 टक्के घट

ऑगस्ट महिन्यानंतर मात्र सोन्याच्या दरात दहा टक्के घसरण पहायला मिळाली. कोव्हिड 19 वरील लस येण्याच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांनी दुसऱ्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला. (Gold Rate) सध्या वायदे बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा 50 हजार 300 रुपये झाला आहे.

पुढील वर्षीही सोन्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज

कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 2021 मध्येही गुंतवणूकदारांची पसंती सोन्यालाच असेल. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजाचे दर कमी केले आहेत. अमेरिकेनं दिलेल्या प्रोत्साहन पॅकेजमुळं अर्थव्यवस्थेत डॉलरची उपलब्धता वाढणार आहे. त्यामुळं डॉलरचा दर कमी होणार आहे, त्यामुळं सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे. कोरोनावरील लस उपलब्ध होण्यासह व्याजदर कमी होण्याचे सत्र नवीन वर्षात सुरु राहील. त्यामुळं सोन्याच्या भावातील वाढ कायम राहील.

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 385 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. यानंतर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 49,624 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर 49,239 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर किरकोळ स्वरुपात वाढले आहेत. या वाढीनंतर 1,878 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.