नगर- सोलापूर महामार्गावर बाभूळगाव शिवारात चाकूचा धाक दाखवून सराफाची Saraf लूट केल्याची घटना घडली आहे. चारचाकी गाडीतून प्रवास करणाऱ्या सराफाला दोन मोटारसायकलवरून आलेल्या सहा चोरट्यांनी अडवलं. त्यानंतर पिस्तुलचा धाक दाखवून सतूर आणि तलवारीसह वार करून मारहाण केली. तसंच त्यांच्या जवळील 60 लाख रूपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास  घडली.

मिरजगाव येथील सराफ अतुल पंडीत यांचे माहिजळगाव येथे सराफ दुकान असून नेहमी प्रमाणे सहाच्या दरम्यान त्यांचे लहान बंधू राहूल पंडीत व अतुल पंडीत नेहमीप्रमाणे दुकान आवरून आपल्या चारचाकी गाडीतून मिरजगाव येथे येत होते. मात्र वाटेत नगर- सोलापूर  महामार्गावर बाभूळगाव शिवारात कवठीच्या लवणात दोन मोटारसायकलवरुन आलेल्या सहा चोरट्यांनी त्यांच्या चारचाकी गाडीला मोटारसायकल आडव्या लावून गाडीची काच फोडली.

डोक्याला पिस्तुल Pistol लावून त्यांना सतूर, तलवार व लाकडी दाडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. तसंच त्यांच्या अंदाजे 60 लाख रूपयांचे सोने-चांदीचे दागिने घेऊन पसार झाले.यावेळी पंडीत यांनी तातडीने या घटनेची माहिती आपल्या मित्रांना,नातेवाईकांना व पोलिसांना कळवली. यावेळी एका गाडीवरील तीन चोरटे माहिजळगावच्या दिशेने तर दुसऱ्या गाडीवरील तीन चोरटे बाभूळगाव परिसरात पळाले. या दरम्यान मोठ्या संख्येने नागरीक जमा होऊन चोरट्यांच्या शोध सुरू करण्यात आला.

या याप्रकरणातील आरोपी बाभूळगावमध्ये वैरणीच्या गंजीजवळ पडलेल्या प्लास्टिकच्या ताडपत्रीखाली मोटारसायकल लपवून परिसरातच लपून बसले असून पोलीस व परिसरातील नागरीक चोरट्यांचा शोध उशीरापर्यंत घेत होते.