भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक 
रवी शास्त्री Ravi Shastri यांनी सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या पुनरागमनाची घाई न करण्याचा सल्ला देताना म्हटले की, त्याच्या वैद्यकीय अहवालामध्ये तो पुन्हा दुखापतग्रस्त होण्याचा धोका आहे. यूएईमध्ये इंडियन प्रीमिअर लीगदरम्यान रोहितला स्नायूच्या दुखापतीने सतावले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड झाली नाही. दरम्यान, तो आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी नेटमध्ये सराव करताना दिसला. त्यानंतर त्याच्या फिटनेसबाबत चर्वितचर्वण सुरू झाले. 

शास्त्री म्हणाले, रोहितला संघामध्ये स्थान न देण्याचा निर्णय निवड समितीने त्याचा वैद्यकीय अहवाल बघितल्यानंतर घेतला. शास्त्री यांनी सांगितले की,‌‘बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहितच्या Rohit Shrama दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. आमचा त्यात समावेश नाही. वैद्यकीय समितीने एक अहवाल सोपविला होता आणि त्यांना आपली जबाबदारी चांगली माहीत आहे. यात माझी कुठलीही भूमिका नाही. मी निवड प्रक्रियेचाही भाग नाही. रोहितला पुन्हा दुखापत उद्भवू शकते, असे वैद्यकीय अहवालात नमूद आहे, याची मला कल्पना आहे’

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. त्यात तीन टी-२० आंतरराष्ट्रीय व तीन वन-डे सामने खेळले जाणार आहेत. याव्यतिरिक्त या मालिकेत चार कसोटी सामनेही होतील.  शास्त्री यांनी रोहितला सल्ला दिला आहे की, कारकिर्दीच्या सुरुवातीला जी चूक केली ती पुन्हा करू नकोस.