police-sub-inspector-arrested-in-pune-district

पुणे जिल्ह्यातील (Pune District) चाकणमध्ये लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल चौकशी अर्जातील तक्रारदार यांच्याकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. राहुल शालिग्राम भदाणे, असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली आहे.

म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पैशासंबधित चौकशीमध्ये तक्रारदार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावर तक्रारदार यांनी संबंधित माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाला दिली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून राहुल भदाणे यांच्यावर कारवाई केली.दरम्यान, या कारवाईनंतर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.