nilesh-rane-critized-bhaskar-jadhav-on-his-remark-on-maharashtra-police

कोणताही पुरावा नसताना पोलीस हप्ते घेतात हे म्हणणं बेजबाबदार असून असं वक्तव्य करणाऱ्या भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र पोलिसांची तात्काळ माफी मागावी अशी मागणी माजी खासदार निलेश राणे (Nilesh Raneयांनी केली आहे. माफी न मागितल्यास भास्कर जाधव यांचे सर्व धंदे पुराव्या सकट बाहेर काढू असा गंभीर इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

स्वतःच्या मतदार संघात कार्यकर्त्यांना बिनधास्त दारू विका असं म्हणणारे भास्कर जाधव हे कोकणातले आमदार आहेत हे सांगायला देखील लाज वाटते असंही राणे यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव हे नुसतंच बोलत असतात काम काहीच करत नाहीत. नशिबाने मोठी पदे मिळूनही त्यांनी काहीही विकास केलेला नाही अशी टीकाही त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली आहे.

गुहागर मधील एका कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाच्या दारू विक्रीचं समर्थन करताना पोलीस हप्ते घेतात असा थेट आरोप केला होता. त्यानंतर निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ प्रसिद्ध करत ही प्रतिक्रिया दिली आहे.

भास्कर जाधव (Shivsena MLA Bhaskar Jadhav) हे बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण गुहागरमध्ये काही दिवसांपूर्वी त्यांनी बेधडकच नाही तर धक्कादायकं विधानं केली आहेत. शिवसेनेच्या उप तालुका प्रमुखाने पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस (Police) हाफ्ते घेत नाही का? असा उलटा सवालही त्यांनी केला. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर दोन गोष्टी सोडून तुम्ही काहीही करा मी तुमच्या पाठिशी आहे असंही ते कार्यकर्त्यांना म्हणाले.

लॉकडाऊन मध्ये दारू विक्री करताना गुहागर पोलिसांनी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. त्यावर बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी पोलिसांचाच समाचार घेतला. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का? असं ते म्हणाले. मी तुमच्या पाठीशी आहे असेही भास्कर जाधव यांनी जाहीरपणे सांगितलं.

भास्कर जाधवांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मुलींची छेडछाड आणि चोरी या फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे असंही त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वास्त केलं