nifty-ends-above-13050-for-the-first-time

 News on indian stock market : जागतिक बाजारांमधील तेजीचे वातावरण आणि करोनावर लस लवकर मिळण्याची शक्यता वर्तवणाऱ्या बातम्या यांचा अनुकूल परिणाम भारतीय शेअर बाजारात (Indian stock market) दिसून आला. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी (Nifty) या निर्देशांकाने प्रथमच १३ हजारांचा टप्पा पार केला. करोनावरील लस दृष्टीपथात आल्यामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थांना उभारी मिळेल असा आशावाद गुंतवणूकदारांमध्ये बघायला मिळाला असून परिणामी शेअर्सच्या खरेदीमध्ये जोरदार वाढ झाल्याचे मंगळवारी दिसून आलं.

Must Read

1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव

सेन्सेक्स सोमवारच्या तुलनेत ४४६ अंकांची वाढ घेत मंगळवारी ४४,५२३ या उच्चांकावर स्थिरावला. तर निफ्टीनेही १२९ अंकांची झेप घेत १३,०५५ इतकी मजल मारली. निफ्टीने शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच १३ हजारांचा टप्पा पार केला आहे. बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जोरदार उलाढाल दिसून आली. त्याबरोबरच गुंतवणूकदारांनी वाहन उद्योग, धातू व औषधी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचीही जोरदार खरेदी केली.

येत्या काही दिवसांमध्ये निफ्टी १३,३९०-१३,५३० या रेंजमध्ये जाण्याची शक्यता असून घसरण झालीच तर १२,७७०-१२,७३० या पातळीपर्यंतच होईल असा अंदाज सीएमटी चार्टहोल्डर अँड हेड ऑफ एज्युकेशन, एफव्हायईआरएसचे अभिषेक चिंचळकर यांनी व्यक्त केला आहे. अन्य तज्ज्ञांनीही १२,७०० या पातळीवरच निफ्टी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. काही तज्ज्ञांच्या मते तर पुढील काही दिवसांत नफ्यासाठी शेअर्सच्या विक्रीचा कल राहिला तरी गुंतवणूकदारांनी घाबरू न जाता कमी किंमतीत शेअर्स खरेदीचा लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले आहे.

जागतिक शेअर बाजारात आलेल्या उसळीमुळे सोनेबाजारात (gold market) मात्र अपेक्षेप्रमाणे प्रतिकूल परिणाम दिसून आला आहे. गुंतवणूकदारांनी शेअर्सच्या खरेदीत रस दाखवत सोन्या-चांदीमध्ये विक्रीचा सपाटा लावला. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १.४६ टक्क्यांनी घसरत भारतात प्रति १० ग्रॅम ४९ हजार ४८० रुपये या पातळीवर तर चांदीचा भाव २.६३ टक्क्यांनी घसरत ६० हजार ५२५ रुपये प्रति किलो या पातळीवर आला आहे.