ncp-has-decided-expel-chandrasekhar-bhoyar

(Politics) राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राष्ट्रवादी, भाजपा, मनसे या राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवारांचा धूम धडाक्यात प्रचार सुरु आहे. विजयासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. परंतु, याचदरम्यान विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadiअमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. याबाबतचे प्रसिध्दिपत्रक राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रसिध्द केले आहे. चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची हकालपट्टी केल्यानं आता शिवसेनेला मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. 

राष्ट्रवादीने ट्विटरद्वारे म्हटले की, विधान परिषद अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाकडून श्रीकांत गोविंद देशपांडे वैधरीत्या नामनिर्देशित अधिकृत उमेदवार आहेत. चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवताहेत. चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी केलेली कृती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिस्त भंग करणारी असल्याने प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या आदेशाने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येत आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत गोविंद देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.

तत्पूर्वी, शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे 2014 च्या निवडणुकीत अमरावती शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले होते. यावेळी ते महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. भाजपनं नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे. दिलीप निंभोरकर हे शिक्षक भारती तर्फे तर भाजपा नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bondeयांच्या बहीण संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समिती कडून निवडणूक लढवतील. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघांचे प्रकाश काळबांडे हे देखील निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, राज्यातील ५ विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पाचही जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जुलै महिन्यात या जागांची मुदत संपली होती. मात्र कोरानामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.