आयपीएल (IPL 2020) च्या ग्रुप स्टेजमधल्या शेवटच्या काही मॅच बाकी असतानाही प्ले-ऑफची चुरस आणखी वाढली आहे. प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत फक्त मुंबईची टीम क्वालिफाय झाली आहे. तर चेन्नई आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता उरलेल्या 3 जागांसाठी 6 टीममध्ये स्पर्धा कायम आहे.

मुंबई (Mumbai)ने दिल्लीवर 9 विकेटने दणदणीत विजय मिळवला, तर हैदराबादने बँगलोरचा पराभव केला, त्यामुळे आता मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम राहणार हे निश्चित झालं आहे. तसंच मुंबईचा प्ले-ऑफमध्ये सामना कोणत्या टीमशी होणार हे चित्रही स्पष्ट होऊ लागलं आहे.

दिल्ली आणि बँगलोर यांच्या खात्यात सध्या 14 पॉईंट्स आहेत. या दोन्ही टीममध्ये सोमवारी मॅच होणार आहे, या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम मुंबईविरुद्ध प्ले-ऑफमधला पहिला क्वालिफायर सामना खेळेल. त्यामुळे मुंबईला पहिल्या प्ले-ऑफमध्ये बँगलोर किंवा दिल्ली यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. 5 नोव्हेंबरला प्ले-ऑफचा हा पहिला सामना रंगणार आहे. या मॅचमध्ये विजय मिळवणारी टीम फायनल गाठेल, तर पराभव झालेल्या टीमला फायनलला पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल.

आयपीएलच्या या निकालांमुळे आता दोन टीम 14 पॉईंट्ससह प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवणार हेदेखील निश्चित झालं आहे. प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आता बँगलोर आणि दिल्लीबरोबरच हैदराबाद, पंजाब, राजस्थान आणि कोलकाता यांच्यात चुरस आहे. या सगळ्या टीमच्या आता शेवटच्या मॅच राहिल्या आहेत.

बँगलोर आणि दिल्लीच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत, तर हैदराबाद, पंजाब, राजस्थान आणि कोलकाता यांच्या खात्यात 12 पॉईंट्स आहेत. पण नेटरनरेटमुळे या टीमच्या क्रमवारीमध्ये फरक आहे. प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी या टीमना त्यांचा चांगला नेट रनरेटच कामी येणार आहे. या सगळ्या टीममध्ये फक्त हैदराबादचा नेट रनरेट प्लसमध्ये आहे. त्यामुळे हैदराबादने शेवटचा सामना जिंकला तर त्यांचा प्ले-ऑफचा प्रवेश निश्चित होईल.

नेट रनरेटचा खेळ

बँगलोरचा नेट रनरेट -0.145 एवढा आहे. (पॉईंट्स- 14)

दिल्लीचा नेट रनरेट -0.159 एवढा आहे. (पॉईंट्स- 14)

हैदराबादचा नेट रनरेट 0.555 एवढा आहे. (पॉईंट्स 12)

पंजाबचा नेट रनरेट -1.333 एवढा आहे. (पॉईंट्स 12)

राजस्थानचा नेट रनरेट -0.377 एवढा आहे. (पॉईंट्स 12)

कोलकाताचा नेट रनरेट -0.467 एवढा आहे. (पॉईंट्स 12)