cricket-india-vs-australia-steve-smith-starts-mind-games

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीम सिडनीमध्ये दाखल झाली आहे. कोरोना (coron) स्ट निगेटिव्ह आल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सरावालाही सुरुवात केली आहे. 27 नोव्हेंबरला वनडे सीरिजपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होईल, यानंतर टी-20 आणि टेस्ट सीरिजही खेळवली जाणार आहे. पण या दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजला महत्त्व प्राप्त झालं आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवातही झाली नसली, तरी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून नेहमीप्रमाणे माईंड गेम खेळायला सुरुवात झाली आहे.

ऑस्ट्रेलिया टीमचा रन मशिन असलेल्या स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने भारताच्या फास्ट बॉलरना आव्हान दिलं आहे. आयुष्यात एवढ्या शॉर्ट पिच बॉलिंगचा सामना केला आहे, त्यामुळे याची आता भीती वाटत नसल्याचं स्मिथ म्हणाला. तसंच मला शॉर्ट पिच बॉलिंग केली, तर त्याचा फायदा ऑस्ट्रेलियालाच होईल, कारण आता मला अशा बॉलिंगचा अजिबात ताण येत नाही, असं स्मिथ म्हणाला.

वॅगनरने 4 वेळा केलं स्मिथला आऊट

न्यूझीलंडचा डावखुरा फास्ट बॉलर नील वॅगनरने मागच्या मोसमात स्मिथला 4 वेळा शॉर्ट पिच बॉलिंगवर आऊट केलं होतं. वॅगनरने चांगली बॉलिंग केली होती, पण आता दुसरं कोणी त्याची पुनरावृत्ती करू शकत नाही. काही विरोधी टीमनी याचा प्रयत्न केला, पण यामध्ये त्यांना यश आलं नाही. वॅगनर उत्तम बॉलर आहे, अशी प्रतिक्रिया स्मिथने दिली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यात भारताच्या फास्ट बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांच्याकडे असेल, तर त्यांच्यासोबत उमेश यादव आणि नवदीप सैनी यांचीही टेस्ट टीममध्ये निवड करण्यात आली आहे. वनडे आणि टी-20 सीरिज संपल्यानंतर 17 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. ऍडलेडमध्ये सीरिजची पहिली टेस्ट खेळवली जाईल. ही टेस्ट मॅच डे-नाईट असेल, त्यामुळे गुलाबी बॉलने खेळवली जाईल. परदेशामध्ये भारताची ही पहिलीच डे-नाईट टेस्ट असणार आहे. याआधी भारताने कोलकात्यामध्ये एकमेव डे-नाईट टेस्ट बांगलादेशविरुद्ध खेळली होती.

ऍडलेडमधली पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराटने दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.