बिहार विधानसभा (Assembly) निवडणुकांमध्ये काठावरचे बहुमत मिळालेल्या एनडीएने आणखी आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बिहार काँग्रेसमध्ये फूट पडून त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही जण एनडीएत सामील होतील, अशी जोरदार चर्चा आहे. या निवडणुकांत महाआघाडीमध्ये काँग्रेसने सर्वात खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे महाआघाडी सत्ता मिळविण्यापासून वंचित राहिली. काँग्रेसचे १९ आमदार निवडून आले असून त्यांनी एनडीएमध्ये सामील व्हावे, असे आवाहन हिंदुस्थान अवाम मोर्चाचे नेते जितनराम मांझी यांनी केले आहे. त्यानंतरच बिहार काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चेला वेग आला. 

बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीएने १२५, तर महाआघाडीने ११० जागा जिंकल्या आहेत.  काँग्रेसमध्ये फूट पडल्यास बिहारमधील राजकारणाला २०१७ सालाप्रमाणे वेगळे वळण लागेल. त्यावर्षी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाआघाडीची साथ सोडून एनडीएमध्ये प्रवेश केला.  त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासह काही नेते नितीशकुमारांच्या जनता दल (यु) मध्ये सामील झाले होते. (वृत्तसंस्था) 

घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता 

गेल्या काही वर्षांत गोवा, गुजरात, मध्यप्रदेशातील काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बिहारमध्येही याच घटनेची पुनरावृत्ती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसे होईल यासाठी भाजप वाट पाहत आहे.