big-update-on-electricity-bills

कोरोना (corona) काळात भरघोस आलेल्या बिलांबाबत राज्य सरकारकडून सवलत देण्याची शक्यता अखेर मावळली आहे. दिवाळी आधी सामान्य जनतेला दिलासा मिळालेला नाही. याउलट आता बिल भरण्यासाठी महावितरण (MSEDCL) खाते भविष्यात तकादा लावण्याची शक्यता असून त्यादृष्टीने हालचालीही सुरू झाल्या आहेत.

महावितरणने वीज बिल वसुलीसंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामुळे वीज बिल वसुली करण्याचे निर्देश महावितरणने दिले आहेत, हे स्पष्ट आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. महावितरणने दिलेली बिलं कशी योग्य आहेत हे ग्राहकांना समजावून सांगावे, असंही कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.

प्रत्येक ठिकाणी जाऊन मीटर रीडिंग, वीज बिल छपाई आणि वीज बिल वाटप सुरू होणार आहे. वीज बिल वसुलीसाठी मेळावे घ्यावे, वीज ग्राहकांना टप्या-टप्याने वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, थकबाकी वसुलीसाठी जनजागृती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वीज बिल वसुलीचे प्रमाण असमाधानकारक असल्याचंही महावितरणचं म्हणणं आहे.

दरम्यान, महावितरणच्या या भूमिकेमुळे वीज बिल कमी होईल, या अपेक्षेत असणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी काळात वाढीव वीज बिल आलेल्या नागरिकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.