be-aware-from-fake-news-on-social-media

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करायला फार वेळ लागत नाही. अनेक लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचं काम करतात. अज्ञानामुळे लोकही त्यावर विश्वास ठेवतात. काही वेळा बँकेतून बोलत आहोत असं सांगून बँक अकाऊंटचे डिटेल्स (Bank Account) मागितले जातात. काही वेळा ट्विटर, यूट्यूब किंवा इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साइट्सवरुन खोट्या बातम्या (Fake News) दिल्या जातात. यामुळे लोकांना आर्थिक नुकसानालाही (Financial Loss)  सामोरं जावं लागतं.आम्ही तुम्हाला हे सगळं सांगत आहोत कारण, सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

पीआयबीने ट्वीट केलं आहे की, ‘एका व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) केंद्र सरकारच्या एका स्कीमबद्दल सांगितलं जात आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून मुलींच्या खात्यामध्ये दरमहा 2500 रुपये ट्रान्सफर केले जातात असं सांगितलं आहे. हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. केंद्राने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही. एका यूट्यूब व्हिडीओमध्ये कन्या सन्मान योजना (Kanya Sanman Yojna) या स्कीम अंतर्गत मुलींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2500 हजार रुपये भरले जातात असा दावा करण्यात आला. पण हा व्हिडीओ खोटा असून त्यावर सामान्य माणसांनी विश्वास ठेवू नये.’

#PIBFactCheck ने हा व्हिडीओ खोटा असल्याचं सांगितलं आहे. अशा योजनांवर विश्वास ठेवण्याआधी लोकांनी त्याबद्दल पूर्ण माहिती घ्यावी. केंद्र किंवा राज्य सरकार जेव्हा कोणत्याही योजना सुरू करतं तेव्हा सर्वात आधी त्याची माहिती संबंधित मंत्रालयाकडून दिली जाते. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर आलेल्या मेसेजपेक्षा सरकारी वेबसाईट, पीआयबी आणि विश्वासार्ह माध्यमांमधून माहिती घ्यावी.