अभिनेता राणा दग्गुबातीने (Rana Daggubati) बाहुबली (Bahubali)' या ब्लॉकबस्टर सिनेमामध्ये जबदरस्त अभिनय करुन फक्त दाक्षिण भारतातीलच नाही तर देशभरातील लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. बाहुबलीच्या अर्थात प्रभासच्या (Prabhas) तोडीस तोड अभिनय राणाने केला होता. त्यामुळे या सिनेमाचं वजन आणखी वाढलं होतं. बाहुबली या सिनेमामुळे जसे प्रभासचे चाहते वाढले तशीच राणालाही संपूर्ण भारतामध्ये ओळख मिळाली. आता राणा दग्गुबाती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ते कारण आहे त्याच्या आजारपणाचं.

समंथा अक्किनेकीच्या शोमध्ये राणाने त्याच्या आजारपणाबाबत माहिती दिली. या टॉक शोचा प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहे. राणाने सांगितले, ‘आयुष्य एकदम मस्त सुरू असताना एक जोरदार ब्रेक लागला. तो माझ्या आजारपणामुळे. मला आधीपासूनच बीपीचा त्रास होता. हृदयाच्या चारही बाजूंना कॅल्सिफिकेशन होतं. किडनी फेल झाली होती. हॅमरेजची शक्यता 70 टक्के होती. कदाचित जीवही गेला असता.’ राणाने सांगितलेल्या या थरारक अनुभवामुळे त्याचे चाहतेच काय पण खुद्द समंथाही भावूक झाली होती.

2019च्या जुलै महिन्यात राणाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तो प्रचंड अशक्त झालेला दिसत होता. त्यानंतर त्याच्या किडनी प्रत्यारोपणाच्या अफवा पसरल्या होत्या. पण त्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा खुद्द राणानेच केला होता. आजारपणामुळे राणा दग्गुबातीची दृष्टीही काही काळासाठी कमजोर झाली होती. पण आता पुन्हा एकदा तो आपल्या पूर्वीच्याच जोशात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

राणा दग्गुबाती लवकरच 'हाथी मेरे साथी' या सिनेमामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा अनेक भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मराठी अभिनेत्री श्रिया पिळगावकरही दिसणार आहे. राणाने नुकतंच लग्न केलं आहे. त्याच्या हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.