bollywood- प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन झालं आहे. मनोरंजन विश्वात त्यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांनी वयाच्या 85 व्या वर्षी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. कोलकातामधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांची टीम शेवटपर्यंत प्रयत्न करत होती मात्र सर्व प्रयत्न तोकडे पडले.
दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या सौमित्र चॅटर्जी यांची प्रकृती बिघडली होती. 6 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाची दुसरी चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर देखील त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. गेल्या काही तासांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालवल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. त्यांचा अशा जाण्यामुळे कुटुंबीयच नाही तर संपूर्ण मनोरंजन विश्वात (bollywood) शोकाकुल वातावरण आहे.