Strict-security-in-Kolhapur

पुणे पदवीधर (Pune graduates) आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या (1 डिसेंबर) होणाऱ्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. ' पदवीधर साठी 205, तर ' शिक्षक साठी 76 अशा एकूण 281 मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहर, जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर रविवारी सायंकाळी बंदोबस्त दाखल झाला आहे. 

निवडणूक (Election) काळात वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन अथवा गैरप्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्यास प्रसंगी संबंधितांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. बलकवडे यांनी रविवारी अपर अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मतदान प्रक्रियेपासून मतमोजणी काळापर्यंत सतर्क राहण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी यंदा चुरशीची निवडणूक होत आहे. घरोघरी प्रचार यंत्रणा राबवून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उमेदवारांसह समर्थकांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याने कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मतदान काळात केंद्रासह परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस दलाने खबरदारी घेतली आहे. 'पदवीधर'च्या 205 व 'शिक्षक'च्या 76 केंद्रांवर अधिकाऱ्यांसह प्रत्येकी दोन कॉन्स्टेबलची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदाराशिवाय अन्य कोणास शंभर मीटर अंतर क्षेत्रात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.