इचलकरंजी येथे दिवाळीच्या सणानिमित्त वाहतूक करणार्‍या प्रवाशांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. 12 नोव्हेंबरपासून या जादा बसगाड्या सोडण्यास सुरवात झाली असून 23 नोव्हेंबरपर्यंत जादा बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी दिली.

Must Read

1) जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा पाचशेपार

2) जेलमधून सुटल्यानंतर अर्णब गोस्वामीचं शक्तीप्रदर्शन

3) शेअर बाजार तेजीतच; गुंतवणूक ‘करेक्शन’नंतर

4) HIV टाळण्यासाठी दररोज औषध घेण्याची नाही गरज पण...

5) रणबीर पहिल्यांदाच आलियासोबतच्या Relationship बाबत काय म्हणाला...

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मास्क, सॅनिटायझरसह अन्य नियमांचे पालन करून प्रवाशांना एसटीने प्रवास करता येणार आहे. तसेच महामंडळातर्फे नियमितपणे बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण केले जात असल्याची बोगरे यांनी दिली आहे. कोरोनामुळे  जवळपास सहा महिने संपूर्ण एस.टी. सेवा बंद ठेवण्यात आली होती. महिन्याभरापासून शासनाने काही नियम व अटी घालून एस. टी. सेवा सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार इचलकरंजी आगारातून योग्य ते नियोजन करुन बसेसच्या फेर्‍या सुरु करण्यात आल्या. इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुका आणि नजीकच्या सीमाभागातील प्रवाशांसाठी इचलकरंजी बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे.

दिपावलीच्या निमित्ताने पुणे मार्गावर दैनंदिन फेर्‍यांशिवाय जादा 5 बसेस सोडण्यात येणार आहेत. सध्या पुणे मार्गावर सकाळी 5.30, 6.00, 6.30, 7.00, 8.00, 8.30.11.30 व दुपारी 1.30 आणि 4.30 वाजता बसेस सुरु आहेत. तर सोलापूर मार्गावर दररोज सकाळी 6.00, 7.00, 8.30, 10.00, 11.00 व दुपारी 1.00 वाजता बसेस सुरु आहेत. त्याचबरोबर दिवाळी पाडवा, भाऊबीजेच्या निमित्ताने सांगली, मिरज, कोल्हापूर, निपाणी, कागल, वाठार या मार्गावर जादा बसेस सोडल्या जातील. पुणे, सोलापूर मार्गावरही प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा बसेस सोडण्यात येतील. यामुळे प्रवासासाठी बाहेर पडणार्‍या प्रवाशांची गैरसोय टळणार असून, सुरक्षित प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे, असेही बोगरे यांनी सांगितले.